UP West Separate News: देशभरात आगामी लोकसभा निवडणुकांसह काही राज्यातील विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू असतानाच उत्तर प्रदेश विभाजनाचा मुद्दा समोर आला आहे. उत्तर प्रदेशचे विभाजन करण्यात यावे. पश्चिम उत्तर प्रदेशचा भाग वेगळा करावा, अशी मागणी चक्क एका केंद्रीय मंत्र्यांनी केली आहे. एवढेच नव्हे तर पश्चिम उत्तर प्रदेशची राजधानी कोणती असेल, याचे नावही सूचवले आहे. या केंद्रीय मंत्र्यांनी उत्तर प्रदेशचे विभाजन करण्याच्या मागणीची काही कारणेही सांगितली आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्री संजीव बालियान यांनी मोठे वक्तव्य केले आहे. बालियान यांनी पश्चिम उत्तर प्रदेशला नवीन राज्य करण्याची मागणी केली आहे. पश्चिम उत्तर प्रदेशला वेगळे राज्य बनवून मेरठला त्याची राजधानी घोषित करण्यात यावे, असे बालियान यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, पश्चिम उत्तर प्रदेशला वेगळे राज्य करण्याची मागणी गेल्या अनेक काळापासून केली जात आहे.
पश्चिम उत्तर प्रदेश नवे राज्य का हवे?
संजीव बालियान यांनी आंतरराष्ट्रीय जाट संसदेत सांगितले की, येथील लोकसंख्या आठ कोटी आहे आणि उच्च न्यायालय येथून ७५० किलोमीटर अंतरावर आहे. अशा परिस्थितीत वेगळ्या राज्याची मागणी पूर्णपणे न्याय्य आहे, असे मत बालियान यांनी व्यक्त केले. जाट हे राष्ट्रवादी समुदाय असल्याचे सांगताना संजीव बालियान म्हणाले की, राजकारणात सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची गरज आहे. जाटांशिवाय कोणीही गावाचा प्रमुख होऊ शकत नाही. सरकारने जाट आरक्षणासाठी बाजू भक्कमपणे न्यायालयात मांडली नाही, असे म्हणणे चुकीचे ठरेल. भविष्यात जो कोणी आरक्षणावर बोलेल त्याला पाठिंबा देईन, असे आश्वासन बालियान यांनी दिले. मात्र, बालियान यांच्या या मागणीला अनेकांनी विरोध दर्शवला.
दरम्यान, बैठकीत ओबीसी प्रवर्गाला केंद्रात आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. बेगम पुल रॅपिड स्टेशनला चौधरी चरणसिंग असे नाव देण्याचीही मागणी करण्यात आली. त्याचबरोबर माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग, सर छोटू राम आणि राजा महेंद्रसिंग यांना भारतरत्न द्यावा आणि देशाच्या नवीन संसद भवनात महाराजा सूरजमल यांचे स्मारक उभारावे, अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या.