नवी दिल्ली : राज्यसभेच्या सात रिक्त जागांसाठी येत्या ४ ऑक्टोबरला पोटनिवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपने केंद्रीय बंदरे, जहाज उद्योग खात्याचे मंत्री सर्वानंद सोनोवाल व केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याचे राज्यमंत्री एल. मुरुगन यांना अनुक्रमे आसाम व मध्य प्रदेशमधून उमेदवारी दिली आहे. महाराष्ट्रातील जागेसाठी भाजपने अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही.
तमिळनाडूतून अण्णा द्रमुकचे राज्यसभा खासदार के. पी. मुन्नूस्वामी, आर. वैतलिंगम यांनी राजीनामा दिल्याने तिथे दोन जागा रिकाम्या झाल्या. मध्य प्रदेशात भाजपचे खासदार थावरसिंह गेहलोत यांची कर्नाटकचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाल्याने त्यांनी राज्यसभा खासदारकी सोडली.
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार मानस रंजन भुनिया यांनी राज्यात मंत्रिपद मिळाल्याने खासदारकीचा राजीनामा दिला. आसामच्या विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने तेथील राज्यसभा खासदार व भाजप नेते विश्वजित दायमारी यांनी खासदारकी सोडली.
महाराष्ट्रात काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे निधन झाल्याने ती जागा रिक्त झाली होती. पुडुचेरीत अण्णाद्रमुकचे नेते गोकुळकृष्णन यांच्या राज्यसभा सदस्यत्वाची मुदत संपली होती.