अमेठीत निकटवर्तीयाची हत्या; स्मृती इराणींनी पार्थिवाला दिला खांदा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 05:26 PM2019-05-26T17:26:43+5:302019-05-26T17:31:19+5:30
माजी सरपंचाच्या हत्येनं अमेठीत मोठी खळबळ
अमेठी: नवनिर्वाचित खासदार स्मृती इराणींचे निकटवर्तीय सुरेंद्र प्रताप सिंह यांच्या हत्येमुळे अमेठीत खळबळ माजली आहे. सिंह यांच्या निधनाचं वृत्त येताच स्मृती इराणी लगेचच अमेठीला पोहोचल्या. त्यांनी सिंह यांच्या कुटुंबाची भेट घेत मारेकऱ्यांना लवकरात लवकर पकडण्यात येईल, असं आश्वासन दिलं. त्यानंतर भावुक झालेल्या इराणींनी सिंह यांच्या पार्थिवाला खांदादेखील दिला.
सुरेंद्र सिंह यांच्या अंत्ययात्रेला उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री आणि भाजपाचे आमदार उपस्थित होते. सुरेंद्र यांची हत्या राजकीय वादातून झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबानं केला. 'स्मृती इराणींच्या विजयाबद्दल आम्ही आनंद साजरा केला. अनेक काँग्रेस समर्थकांना ही बाब रुचली नाही. याच कारणातून वडिलांची हत्या करण्यात आली,' असा गंभीर आरोप अभय सिंह यांनी केला. वडिलांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर पकडण्याचं आणि त्यांना कठोर शिक्षा करण्याचं आवाहन त्यांनी इराणींना केलं.
#WATCH BJP MP from Amethi, Smriti Irani lends a shoulder to mortal remains of Surendra Singh, ex-village head of Barauli, Amethi, who was shot dead last night. pic.twitter.com/jQWV9s2ZwY
— ANI (@ANI) May 26, 2019
शनिवारी रात्री 3 च्या सुमारास काही अज्ञात हल्लेखोरांनी सुरेंद्र सिंह यांची घरात घुसून हत्या केली. त्यावेळी सुरेंद्र वऱ्हांड्यात झोपले होते. बरौलिया गावचे माजी सरपंच असलेल्या सुरेंद्र यांच्यावर गोळीबार करण्यात आला. माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी राज्यसभेचे खासदार असताना बरौलिया गाव दत्तक घेतलं होतं. सुरेंद्र सिंह यांनी यंदाच्या निवडणुकीत स्मृती इराणींच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. सुरेंद्र यांचा अनेक गावांमध्ये उत्तम जनसंपर्क होता. त्याच जोरावर इराणींनी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीत विजय मिळवला.