नवी दिल्ली : तामिळनाडूमधील युवा कल्याण आणि क्रीडा विकास मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्माच्या वक्तव्याचा सातत्याने विरोध होताना दिसत आहे. सनातनसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर उदयनिधी स्टॅलिन राजकीय विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. भाजपही उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर हल्लाबोल करत आहे. आता केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर निशाणा साधला आहे.
जोपर्यंत भारतात भक्त जिवंत आहेत, तोपर्यंत सनातनला कोणीही आव्हान देऊ शकत नाही, असे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या. दिल्लीतील द्वारका येथे स्मृती इराणी यांनी हे मोठे वक्तव्य केले आहे. 'सनातन धर्माला' आव्हान देणाऱ्यांपर्यंत आमचा आवाज पोहोचला पाहिजे. जोपर्यंत भक्त जिवंत आहेत, तोपर्यंत आमच्या 'धर्म' आणि श्रद्धेला कोणीही आव्हान देऊ शकत नाही, असे द्वारकेतील जन्माष्टमी उत्सवादरम्यान स्मृती इराणी म्हणाल्या. यानंतर त्यांनी उपस्थित लोकांना मोठ्याने कृष्ण कन्हैया लाल की, जय... म्हणण्याचे आवाहन केले.
काय म्हणाले होते उदयनिधी स्टॅलिन?उदयनिधी स्टॅलिन यांनी शनिवारी (2 सप्टेंबर) चेन्नई येथे बोलताना सनातन धर्माची तुलना मलेरिया आणि डेंग्यूशी केली होती. उदयनिधी स्टॅलिन म्हणाले की, सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींचा विरोध करता येत नाही. त्या संपवल्याच पाहिजे. जसे की, डासांमुळे डेंग्यू, कोरोना आणि मलेरियासारखे आजार होतात. त्यांचा आपण विरोध करू शकत नाही, त्यांचा नायनाट करावा लागतो. सनातन धर्मही तसाच आहे, असे वक्तव्य त्यांनी केले होते.
उदयनिधी स्टॅलिन यांनी वादावर दिलं स्पष्टीकरणसनातन धर्मावरील या टिप्पणीनंतर उदयनिधी स्टॅलिन यांनीही स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले होते, "मी कधीही सनातन धर्माच्या अनुयायांच्या नरसंहाराची हाक दिलेली नाही. मी फक्त सनातन धर्मावर टीका केली आहे आणि सनातन धर्म नष्ट झाला पाहिजे, असं मी वारंवार सांगेन. भाजपचे काम खोट्या बातम्या पसरवणं आहे. आणि भाजप माझ्या वक्तव्याचा विपर्यास करत आहे."