लखनऊ: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीपंतप्रधानपदाची स्वप्नं पाहत आहेत, तर पाहू दे. स्वप्न पाहण्यास कुठे मनाई आहे. राहुल गांधींची स्वप्नं म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने आहेत, असा टोला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी लगावला आहे. राहुल गांधी यांचा मतदारसंघ असलेल्या अमेठीत 'भावी पंतप्रधान' असा उल्लेख असलेले राहुल गांधींचे पोस्टर लावण्यात आले आहेत. त्यावरुन इराणींनी टोला लगावला. स्मृती इराणी सध्या अमेठी दौऱ्यावर आहेत. छत्तीसगढ, मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये काँग्रेसनं भाजपाचा पराभव केल्यावर अमेठीत राहुल गांधींचे बॅनर झळकले. यावर 'भावी पंतप्रधान' असा उल्लेख आहे. त्यावर पत्रकारांनी स्मृती इराणींना त्यांची प्रतिक्रिया विचारली. यावर बोलताना स्वप्न पाहण्यास कुठे मनाई आहे? असा प्रश्न विचारत स्मृती इराणींनी राहुल गांधींना टोला लगावला. 'राहुल गांधींना महाआघाडीत तसा (पंतप्रधानपदाचा) आशीर्वाद ना मायावतींनी दिलाय, ना अखिलेशनं दिलाय. ममता गांधींनीही राहुल यांच्या पंतप्रधानपदाबद्दल अनुकूल भाष्य केलेलं नाही. मग मुंगेरीलालची स्वप्नं पाहायला कोणी मनाई केली आहे?' असं इराणी म्हणाल्या.आगामी लोकसभा निवडणुकीसाठी स्मृती इराणी कामाला लागल्या आहेत. गेल्या निवडणुकीत अमेठीत इराणींनी राहुल यांना टक्कर दिली होती. मात्र त्या पराभूत झाल्या होत्या. येत्या काही महिन्यात लोकसभा निवडणूक होईल. गेल्या महिन्यातच काँग्रेसनं हिंदी पट्ट्यातील तीन राज्यांमध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. त्यातच राहुल गांधी संसदेतही सक्रीय झाले आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधींना धक्का देण्यासाठी इराणींनी कंबर कसली आहे.