केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी रविवारी ट्विट करून ही माहिती दिली. स्मृती इराणी या दिल्लीतील राजेंद्र नगरमध्ये एका निवडणूक सभेसाठी उपस्थित राहणार होत्या. मात्र त्यांनी तेथील लोकांची माफी मागत, आपला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आपण कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही, असे म्हटले आहे.
दिल्लीतील राजेंद्र नगर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी 23 जून रोजी मतदान होत आहे. भाजपचे उमेदवार राजेश भाटिया यांच्या समर्थनार्थ स्मृती इराणी रविवारी निवडणूक सभेत सहभागी होणार होत्या. त्यांचा कार्यक्रम ठरलेला होता. मात्र, त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे ट्विट त्यांनी केले आहे. यामुळे आता त्यांना या निवडणूक सभेत सहभागी होता येणार नाही.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना दोन वर्षांपूर्वी, म्हणजेच 2020 मध्येही कोरोनाची लागण झाली होती. तेव्हा, आपल्याला कोरोनाची लागण झाली आहे. जे कुणी आपल्या संपर्कात आले होते, त्यांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी, अशी मी विनंती करते, असे त्यांनी म्हटले होते.'