ट्विटर आणि केंद्र सरकारमध्ये सुरू असलेला वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. ट्विटरनं नुकतंच केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान व कौशल्य विकास राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या ट्विटर हँडलची 'ब्लू टिक' हटवली होती. चूक लक्षात आल्यानंतर काही वेळानं ट्विटरकडून चंद्रशेखर यांच्या हँडलची 'ब्लू टिक' पूर्ववत करण्यात आली. पण आता नव्या वादाला फोडणी मिळाली आहे.
केंद्र सरकारनं लागू केलेल्या नव्या नियमांची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करणाऱ्या ट्विटरला न्यायालयानं झटका दिला आहे. केंद्र सरकारनं जारी केलेल्या नियमांचं पालन ट्विटरला करावं लागेल असा निकाल कोर्टानं दिल्यानंतर कंपनी बॅकफूटवर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडिया संदर्भातील नव्या नियमांचा स्वीकार करण्यास ट्विटरनं आक्षेप घेतला होता. त्यामुळे केंद्र सरकार आणि ट्विटरमध्ये अनेकदा खटके देखील उडाले. त्यात नवनिर्वाचित केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही परदेशी कंपन्यांना भारतीय कायद्यांचं पालन करावंच लागेल अशी ठाम भूमिका घेत ट्विटरला इशारा दिला होता.
ट्विटरवर अधिकृत ट्विटर हँडल्सला ब्लू टिक दिली जाते. यावरुन संबंधित ट्विटर हँडलची सत्यता यूझरला लक्षात येते. केंद्रीय मंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलला ब्लू टिक देण्यात येते. यावरुन सरकारमधील मंत्र्यांच्या अधिकृत भूमिकेची कल्पना युझर्सना येते. केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या ट्विटर अकाऊंटला ब्लू टिक होती. पण आज अचानक त्यांच्या अकाऊंटची ब्लू टिक काढून टाकण्यात आली. यामागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पण चूक लक्षात येताच ट्विटरनं ब्लू टिक पूर्ववत केली आहे.