नवी दिल्ली, दि. 1 - केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या रविवारी म्हणजेच 3 सप्टेंबरला होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी केंद्रीय कामगार राज्यमंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी शुक्रवारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. काल रात्री उशिरा केंद्रीय कौशल्य विकास मंत्री राजीव प्रताप रूडी मंत्रिपदाचा राजीनामा सादर केला आहे. याचबरोबर, गंगा शुद्धीकरण खात्याच्या मंत्री उमा भारती यांनीदेखील तब्येतीचे कारण पुढे करत आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. यासोबतच केंद्रीय मंत्री संजीव बाल्यान, कलराज मिश्र आणि महेंद्रनाथ पांडे यांनी देखील राजीनामा सादर केला आहे. सध्या या चौघांच्या राजीनाम्यावर निर्णय घेण्यात आलेला नाही.दरम्यान, आता केंद्रीय कामगार राज्यमंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी सुद्धा आपल्याचा पदाचा राजीनामा दिला आहे. बंडारू दत्तात्रेय हे तेलंगणातील सिकंदराबाद येथून लोकसभेवर निवडून आले आहेत. सध्या राजधानी दिल्लीत मंत्रिमंडळ विस्ताराआधी अनेक मोठ्या घडामोडी सुरु आहेत.
गडकरींकडे ‘रेल्वे’ जवळपास निश्चित..अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संरक्षणमंत्रीपदाची जबाबदारी फार दिवस राहणार नसल्याचे केलेले विधान व भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांच्या भेटीसाठी मंत्र्यांची झालेली गर्दी यामुळे मंत्रिमंडळात फेरबदलाची चर्चा सुरू झाली. रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे रेल्वे खाते येऊ शकते. तर, सुरेश प्रभू यांना मंत्रिमंडळात कायम ठेवून गंगा शुद्धीकरण आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाची जबाबदारी दिली जाऊ शकते. संरक्षण खात्याची जबाबदारी कोणाकडे येईल हे स्पष्ट नाही.