नवी दिल्ली - संजय लीला भन्साळी यांचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित सिनेमा 'पद्मावती' रिलीजपूर्वीच वादाच्या भोव-यात अडकला आहे. या सिनेमामागील अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. शुटींगपासूनच संजय लीला भन्साळी यांच्या या महत्त्वाकांक्षी अशा या सिनेमाला विरोध होत आहे. दरम्यान, आता या वादात केंद्रीय मंत्री उभा भारती यांनीही उडी घेतली आहे. ज्या मुद्यांवरुन या सिनेमाला विरोध केला जात आहे ते पाहता उमा भारती यांनी म्हटलं आहे की, ''याप्रकरणात मी कोणत्याही प्रकारे तटस्थ राहू शकत नाही''.
ऐतिहासिक बाबींमध्ये छेडछाड केल्याचा आक्षेप घेत श्रीराजपूत करणी सेनेनं सिनेमाला विरोध दर्शवला आहे. त्यांचे असे म्हणणं आहे की, सिनेमामध्ये महाराणी पद्मिनीला अलाउद्दीनच्या प्रेयसीच्या भूमिकेत दाखवण्यात येणार आहे. मात्र चित्तोडगडच्या इतिहासासंदर्भात लिहिण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये महाराणी पद्मिनी कधीही अलाउद्दीन खिलजीला भेटल्याचा उल्लेख करण्यात आलेला नाही.या मुद्यावरुन उमा भारती यांनी ट्विट करत आपली भूमिका मांडली आहे. राणी पद्मावती यांच्याविषयी सुरू असलेल्या वादाप्रकरणी मी शांत बसू शकत नाही. पद्मावती यांना राजपूत समाजासोबत न जोडता, भारतीय नारीच्या अस्मितेशी जोडण्यात यावं, असे ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे. सिनेमा रिलीज होण्यापूर्वी इतिहासकार, सिनेनिर्माते आणि आक्षेप घेणारा समाजाचे प्रतिनिधी आणि सेंसर बोर्ड मिळून समिती बनवावी आणि यावर निर्णय घ्यावा, असेदेखील उमा भारती यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, पद्मावती सिनेमा प्रदर्शित करण्यापूर्वी तो राजपूत प्रतिनिधिंना दाखविला जावा, अशी मागणी भाजपाने निवडणूक आयोग आणि गुजरात मुख्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे. राजपूत प्रतिनिधींना सिनेमा दाखविला तर सिनेमावरील त्यांचा रोष कमी होईल तसंच आगामी गुजरात निवडणुकांच्यावेळी कुठलीही तणावपूर्ण परिस्थिती उद्भवणार नाही, असं गुजरात भाजपाने पत्रात म्हटले आहे. पद्मावती सिनेमा गुजरात निवडणुकीनंतर गुजरातमध्ये प्रदर्शित करा किंवा सिनेमाला बॅन करा, असं मत भाजपाचे प्रवक्ते आणि राजपूर नेता आय.के जडेजा यांनी केली आहे. क्षत्रिय, राजपूत प्रतिनिधींनी मला भेटून सिनेमात कुठल्याही प्रकारे इतिहास आणि राणी पद्मावतीच्या चारित्र्याविषयी छेडछाड करणाऱ्या मुद्द्यांना विरोध केला आहे. इतिहासानुसार राणी पद्मावती कधीही अलाऊद्दीन खिलजीला भेटली नव्हती, असं राजपूत प्रतिनिधींनी सांगितल्याचं आय.के.जडेजा यांनी म्हटले. गुजरातच्या निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत. अशातच सिनेमात दाखविण्यात आलेलं कथानक हे तथ्याला धरून असावं, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची छेडाछाड नसावी ज्यामुळे राजपूत, क्षत्रिय समुदायाच्या भावना दुखावल्या जातील.