नवी दिल्ली - 'दिल्ली चलो' आंदोलनासाठी दिल्लीच्या दिशेने निघालेले हजारो शेतकरी अजूनही सिंधू सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. सरकारने आंदोलक शेतकऱ्यांना बुराडी मैदानात आंदोलन करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र शेतकऱ्यांनी सरकारच्या प्रस्तावाला केराची टोपली दाखवत दिल्लीच्या सीमेवरच आंदोलन सुरू ठेवणार असल्याची भूमिका शेतकरी संघटनांनी घेतली आहे. जोवर सरकार कृषी कायदे मागे घेत नाही तोवर आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असतानाच केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी या शेतकरी आंदोलनातील अनेकजण शेतकरी वाटत नसल्याचं म्हटलं आहे.
शेतकऱ्यांच्या या आंदोलनामागे विरोधी पक्षाचा हात असल्याचा आरोप केंद्रीय मंत्र्यांनी केला आहे. व्ही. के. सिंह यांनी केलेल्या या विधानामुळे शेतकरी आंदोलनावरुन राजकीय वातावरण तापणार असल्याचं सध्या चिन्ह दिसत आहे. "फोटोमधील अनेकजण शेतकरी वाटत नाहीत. जे शेतकऱ्यांच्या हिताचं आहे तेच सरकारने केलं आहे. शेतकऱ्यांना कृषी कायद्याची काहीच अडचण नाही. ज्यांना आहे ते शेतकरी नसून इतर लोकं आहेत. या आंदोलनामागे विरोधी पक्षांबरोबरच कमिशन मिळणाऱ्या लोकांचाही हात आहे" असं व्ही. के. सिंह यांनी म्हटलं आहे.
"झूठ की, लूट की, सूट-बूट की सरकार; मित्रांचं उत्पन्न झालं चौपट, शेतकऱ्यांचं मात्र अर्ध"
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहेत. केंद्र सरकारने कृषी कायदा मागे घ्यावा. अशी मागणी शेतकरी करीत आहेत. यासाठी गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, मंगळवारी सरकार व शेतकरी नेत्यांची बैठक झाली. काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा एक व्हिडीओ शेअर करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात, Video शेअर करत साधला निशाणा
राहुल गांधी यांनी बुधवारी (2 डिसेंबर) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "झूठ की, लूट की, सूट-बूट की सरकार" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. "शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार असं सांगितलं गेलं. पण मित्रांचं उत्पन्न चौपट केलं आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न अर्ध होणार. खोटं बोलणारं, लूटणारं आणि सूट-बूट वालं हे सरकार आहे" असा घणाघात राहुल गांधी यांनी केला आहे. यासोबतच शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा एक व्हिडीओ देखील शेअर करत सरकारवर जोरदार निशाणा साधला.