नागपूर : देशाच्या राजकारणात एक कर्तृत्ववान नेते व ‘व्हिजन’ असलेले राजकारणी अशी ओळख असलेले नितीन गडकरी यांनी सलग दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. २०१४ पासून भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी, जलसंपदा व गंगा पुनरुत्थान मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत असताना त्यांनी आपल्या कार्यशैलीने विरोधकांनादेखील प्रभावित केले होते. नवीन जबाबदारी सांभाळत असताना देशासह विदर्भाच्या विकासाला नवी चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. २०१४ साली मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतरच गडकरी यांनी देशभरात कामाचा धडाका लावला होता. त्यांच्या कार्यकाळात राष्ट्रीय महामार्गांचे रुप पालटले व देशात लाखो किलोमीटर लांबीच्या महामार्गांच्या कामाला सुरुवात झाली. विशेष म्हणजे ईशान्येकडील राज्यांमधील महामार्गांचे जाळे विस्तारले. दुसरीकडे गडकरी यांच्या प्रयत्नांतून देशातील जलवाहतुकीलादेखील नवीन संजीवनी मिळाली. वाराणसी ते हल्दिया हा १३९० किलोमीटर लांबीचा जलमार्ग प्रकल्प गडकरी यांच्यामुळे प्रत्यक्षात उतरला. वाराणसी येथे मल्टीमॉडेल हब स्थापन करुन एक इतिहासच रचला. गंगा नदीच्या स्वच्छतेलादेखील गती आली आहे आणि नदीकाठच्या काही मोठ्या शहरातील सांडपाण्यावर प्रक्रियेचे प्रकल्पदेखील कार्यान्वित झाले आहेत. गडकरी यांची कार्यशैली लक्षात घेता नवीन जबाबदाऱ्यादेखील ते त्याच तत्परतेने सांभाळतील व देशातील पायाभूत सुविधांच्या विकासाला वेग येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
स्वयंसेवक ते केंद्रीय मंत्रीराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत वाढलेल्या गडकरी यांनी महाविद्यालयीन जीवनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते म्हणून काम केले. १९८९ मध्ये नागपूर पदवीधर विधानसभा मतदार संघातून त्यांना भाजपाने उमेदवारी दिली. १९८९, १९९६, २००२ मध्ये त्यांनी निवडणुका जिंकल्या. १९९५ साली राज्यात युतीचे सरकारमध्ये त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते सोपविण्यात आले होते आणि त्यांनी मुंबईसह राज्यात १०० हून अधिक उड्डाण पुलांची मालिकाच उभारली. विकासपुरुष, ‘रोडकरी’, ‘पुलकरी’, ही बिरुदे त्यांना या काळात चिकटली. २००९ साली गडकरी यांनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली.