आज दुपारी ३ वाजता केंद्रीय निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकांची घोषणा करणार आहे. त्या अगोदर केंद्रीय मंत्रिमंडळाने मोठ्या प्रकल्पांना मंजूरी दिली आहे. आजपासून देशभरात आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे. आचारसंहिता लागू झाल्यावर कोणताही विभाग कोणताही नवीन प्रकल्प मंजूर करत नाही. दरम्यान मोदी सरकारच्या अनेक खात्यांनी झटपट निर्णय घेऊन कोट्यवधींच्या प्रकल्पांना मंजुरी दिली.
पडणाऱ्या जागा दिल्या! वंचितने प्रस्ताव फेटाळला; महाविकास आघाडी काय करणार?
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या रस्ते वाहतूक मंत्रालय आणि NHAI अंतर्गत विभागांमध्ये शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत काम सुरू होते. या कालावधीत मंत्री गडकरी यांनी १७०० कोटी रुपयांच्या तीन महामार्ग प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. हे महामार्ग प्रकल्प गुजरात, आसाम आणि कर्नाटकसाठी आहेत. याशिवाय उज्जैन रेल्वे स्टेशन ते मध्य प्रदेशातील महाकालेश्वर मंदिरापर्यंत १८९ कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या रोपवेलाही मंजुरी देण्यात आली आहे.
आचारसंहिता लागू होण्यापूर्वी योजनांना तातडीने मंजुरी देण्यात आली. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर नवीन प्रकल्पांना मंजूर देता येत नाही. गडकरी यांच्या व्यतिरिक्त केंद्रीय जहाजबांधणी मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनीही आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीवर ६४५ कोटी रुपयांच्या १० नवीन जलमार्गांना मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारच्या सागरमाला कार्यक्रमांतर्गत या प्रकल्पांना केंद्राकडून १०० टक्के निधी मिळणार आहे. त्याचप्रमाणे गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयाने ९२५ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.
गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयाचे सचिव अनुराग जैन यांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घन आणि द्रव कचरा व्यवस्थापन प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. आदर्श आचारसंहिता लागू होण्याआधी, सरकारने घरगुती कच्च्या तेलावरील विंडफॉल कर ३०० रुपये प्रति टन वाढवून ४,९०० रुपये प्रति टन करण्याची घोषणा केली.