Mukhtar Abbas Naqvi, PM Modi Cabinet: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील लोकप्रिय चेहरा असलेले केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते अल्पसंख्याक मंत्री होते. नकवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर राजीनामा दिला. नक्वी यांनी आज त्यांच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी लावली. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी मंत्री म्हणून नकवी यांच्या योगदानाचे कौतुक केले. याशिवाय, स्टील मंत्री आरसीपी सिंग (RCP Singh) यांनीही आज शेवटची कॅबिनेट बैठक झाल्यावर पदाचा राजीनामा दिला.
पंतप्रधान मोदींनी दोन्ही केंद्रीय मंत्र्यांना निरोप देताना सांगितले की, या दोघांनी मंत्री असताना देशाच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. या दोन्ही मंत्र्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ ७ जुलै रोजी संपत आहे. मुख्तार अब्बास नकवी हे राज्यसभेचे सदस्य होते. त्यांचा कार्यकाळ गुरुवारी संपत आहे. यावेळी भाजपाने नकवी यांना राज्यसभेवर पाठवले नाही. त्यामुळे पक्ष त्यांना मोठी जबाबदारी देऊ शकतो, असे मानले जात आहे. याशिवाय, उपराष्ट्रपती पदासाठी होणाऱ्या निवडणुकीत मुख्तार अब्बास नकवी हे भाजपाचे उमेदवार असू शकतात अशीही चर्चा आहे.
याशिवाय मोदींच्या मंत्रिमंडळातील जेडीयू कोट्यातील मंत्री आरसीपी सिंह यांचा कार्यकाळही गुरुवारी संपत आहे. हे दोन्ही नेते ६ जुलैनंतर कोणत्याही सभागृहाचे सदस्य असणार नाहीत. ते खासदार न होता सहा महिने मंत्री राहू शकतात, पण त्याआधीच त्यांनी मंत्रिमंडळाचा निरोप घेतला.
मोदींच्या मंत्रिमंडळात नकवी ८ वर्षांपासून कार्यरत
मुख्तार अब्बास नकवी हे 2010 ते 2016 पर्यंत यूपीचे राज्यसभा सदस्य होते. 2016 मध्ये त्यांना झारखंडमधून राज्यसभेवर पाठवण्यात आले होते. नकवी यांनी 1998 मध्ये पहिल्यांदा लोकसभा निवडणूक जिंकली आणि अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये त्यांना माहिती आणि प्रसारण मंत्रालयात राज्यमंत्री बनवण्यात आले. त्यानंतर, 26 मे 2014 पासून ते मोदी सरकारमध्ये अल्पसंख्याक कार्य आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री बनले. 12 जुलै 2016 रोजी नजमा हेपतुल्ला यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांना अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार मिळाला. त्यानंतर 30 मे 2019 रोजी मोदी मंत्रिमंडळात पुन्हा सामील झाले आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्रीपद भूषवले.
दरम्यान, दोघांच्या भविष्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. नकवी यांना उपराष्ट्रपतीपद ते राज्यपाल किंवा राज्यांचे नायब राज्यपालपद दिले जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे, आरसीपी सिंह हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.