नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांच्या मुलाविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. या प्रकरणावर भाष्य करताना केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांनी सांगितले की, ही घटना दुख:द आणि दुर्दैवी आहे. कायदा आपला काम करेल. मला या प्रकरणावर कोणतंही भाष्य करण्याची इच्छा नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांचा मुलगा प्रबल पटेल आणि पुतण्या मोनू पटेल याच्याविरोधात हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात प्रबल पटेलला अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार सोमवारी रात्री मध्य प्रदेशातील नरसिंहपूर येथे दोन गटांमध्ये काही कारणास्तव मारहाणीची घटना घडली होती. या घटनेत केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांच्या मुलाविरोधात दहशत पसरविणे आणि हत्येचा प्रयत्न करणे असा आरोप लावण्यात आला आहे. प्रल्हाद पटेल यांच्यावर केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्रिपदाची जबाबदारी आहे.
मध्य प्रदेशातील भोपाळपासून 25 किमी लांब नरसिंहपूरच्या गोटेगाव येथे दोन गटांमध्ये मारहाण झाली होती. या मारहाणीत एका बाजून गोळीबारीही करण्यात आली. यामध्ये एक जण जखमी झाला. त्याच्यावर जबलपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नरसिंहपूर एसपी गुरकरम सिंह यांनी या घटनेत प्रबल पटेलसह 7 जणांना अटक केली आहे. या प्रकरणातील 2 आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी 4 शोध पथके तयार केली आहेत.
तक्रारकर्ते हिमांशू राठौर यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींविरोधात एफआयआर दाखल केली. त्या तक्रारीत सांगण्यात आलं आहे की, तो आपल्या मित्रांसोबत एका लग्नावरुन परतताना वाटेमध्ये प्रबल पटेल आणि त्याच्या साथीदाराने त्यांच्यावर हल्ला केला तसेच गोळीबार केला. या मारहाणीत दोन्ही गटाचे 7 जण जखमी झाले. या सर्व जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.