नितीन अग्रवाल । लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सत्ताधारी भाजपाचा मार्गदर्शक समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक सहयोगी संघटना जीएसटीच्या विरोधात उभ्या ठाकल्या आहेत. स्वदेशी जागरण मंच, लघुउद्योग भारती, भारतीय मजदूर संघ यांनी जीएसटीवरून सरकारवर टीका केली आहे. स्वदेशी जागरण मंचने म्हटले आहे की, जीएसटीच्या नियमांनी लघुउद्योग अडचणीत येणार आहेत. मंचाचे सहसंयोजक अश्वनी महाजन म्हणाले की, आतापर्यंत दीड कोटी रुपयांपर्यंतच्या उद्योगांना उत्पादन करातून सूट दिली जात होती. पण, आता २० लाख रुपयांवरील आर्थिक उलाढाल असणाऱ्या उद्योजकांना जीएसटीत नोंदणी करावी लागेल. याचा फटका लघुउद्योजकांना बसणार आहे. यामुळे चीनहून आयात वाढेल आणि छोट्या उत्पादनांची बाजारपेठ टिकणे अवघड होईल. उद्योग भारतीनेही जीएसटीला विरोध केला आहे. जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर व्यवसाय करणाऱ्यांना जवळपास ३५ प्रकारचे रीटर्न दाखल करावे लागणार आहेत. याची संख्या चारवर आणावी अशी संघटनेची मागणी आहे. जीएसटीनुसार ठरविण्यात आलेल्या दंडात सूट देण्यात यावी. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ओमप्रकाश मित्तल म्हणाले की, जीएसटीचे सध्याचे स्वरूप बदलायला हवे. नोटाबंदीनंतर छोट्या उद्योगांचे काही प्रमाणात नुकसान झाले. जीएसटीच्या नियमामुळे लघू आणि कुटीरोद्योगांचे मोठे नुकसान होणार आहे. भारतीय मजदूर संघही जीएसटीबाबत सरकारच्या विरोधात उभा आहे.
संघाच्या संघटनांचा जीएसटीला विरोध
By admin | Published: June 30, 2017 12:34 AM