आजच्या जगात पैशाला खूप जास्त महत्त्व आहे. त्यामुळे पैशासाठी लोक चुकीच्या गोष्टी देखील करताना दिसतात. याच दरम्यान एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. राजस्थानच्या जालोरच्या बागोरा शहरातील एका व्यक्तीच्या प्रामाणिकपणाचं उत्तम उदाहरण समोर आलं आहे. या व्यक्तीच्या बँक खात्यात चुकून तीन लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम आली होती. पण त्याने प्रामाणिकपणा दाखवून ती रक्कम परत केली आहे. त्यांच्या या वागण्याचं सर्वत्र भरभरून कौतुक केलं जात आहे.
भैरुसिंह चौहान असं या व्यक्तीचं नाव आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांना त्यांच्या खात्यात 3 लाख 33 हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज आला होता. भैरुसिंग चौहान यांनी बँकेत जाऊन या पैशांबद्दल माहिती दिली. तसेच कोणाच्या खात्यातून त्यांना हे पैसे आले आहेत याबाबत देखील शोधून काढलं. तेव्हा त्यांना पदमाराम चौधरी या व्यक्तीच्या खात्यातून पैसे आल्याची माहिती मिळाली.
भैरुसिंह चौहान यांनी प्रामाणिकपणा दाखवत गुरुवारी पदमाराम यांना त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावून त्यांच्या खात्यात आलेले 3 लाख 33 हजार रुपये तातडीने परत केले. कृतज्ञता व्यक्त करताना पदमाराम चौधरी यांनी सांगितलं की, ही रक्कम दुसऱ्या कोणाला तरी पाठवायची होती, मात्र खाते क्रमांकामध्ये घोळ असल्याने ही रक्कम दुसऱ्यात खात्यात गेली. भैरुसिंह चौहान हे प्रामाणिकपणा दाखवून समाजासमोर आदर्श ठरले. news18 हिंदीने याबाबतचे वृत्त दिले आहे.