ऑनलाइन लोकमत
तिरुअनंतपूरम, दि. 3 - प्रेमाला काही सीमा नसते, ते कधीही आणि कोणासोबतही होऊ शकतं. अशीच एक लव्ह स्टोरी सध्या चर्चेत आहे. तो पुर्णवेळ राजकारणी आणि ती एक सनदी अधिकारी. अशी लव्हस्टोरी फार कमी वेळा पाहायला मिळते. काँग्रेस आमदार के एस सबरीनाथन आणि तिरुअनंतपूरमच्या उपजिल्हाधिकारी दिव्या एस अय्यर यांचे सूत जूळले असून दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.
दोघांच्या प्रेमसंबंधावर सुरु असलेल्या चर्चेवर सबरीनाथन यांनीच पुर्णविराम लावला. सबरीनाथन यांनी फेसबूकवर आपलं रिलेशनशिप स्टेटस कमिटेड असं बदललं आणि सर्वांना आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. सबरीनाथन यांनी दिव्या यांच्यासोबत आपला फोटो पोस्ट करत लिहिलं आहे की, "गेल्या काही दिवसांपासून माझ्या जवळचे लोक लग्नासंबंधी चर्चा करत आहेत. आता मला ही घोषणा करताना आनंद होत आहे. माझी उपजिल्हाधिकारी डॉ दिव्या एस अय्यरशी तिरुपअनंतपूरममध्ये भेट झाली होती. त्यानंतर आमच्यामधील जवळीक वाढली, आम्ही एकमेकांना समजून घेतलं. दोन्ही कुटुंबाच्या आशिर्वादाने दिव्या माझी सहचारिणी होणार आहे. आम्ही तुमच्या सर्वांच्या आशिर्वादाची अपेक्षा करतो".
लग्नाची बातमी मिळाल्यापासून उत्साहित झालेल्या दिव्या यांनी सांगितलं आहे की, "एखाद्या सनदी अधिका-याने राजकारण्याशी लग्न केल्याचं माझ्या पाहण्यात नाही. आम्हाला तुमच्या आशिर्वादाची गरज आहे". पुढील महिन्यात दोघांचा विवाहसोहळा पार पडणार आहे.
33 वर्षीय सबरीनाथन यांच्या आई-वडिलांची लव्हस्टोरीही मनोरंजक आहे. त्यांचे वडिल कार्तिकेयन विधानसभा अध्यक्ष राहिले आहेत. कार्तिकेयन यांनी त्यांची पत्नी सुलेखा कॉलेजमध्ये शिकत असतानाच लग्न केलं होतं. तेव्हा कार्तिकेयन नुकतंच राजकारणात आले होते. केरळच्या राजकारणातील उदयाला येणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. दोन्ही कुटुंबाचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. पण कार्तिकेयन यांच्याशी लग्न करण्यासाठी सुलेखा यांनी आपलं घर सोडलं.
सबरीनाथन आणि दिव्या दोघांनाही कुटुबांचा पुर्ण पाठिंबा आहे. दोघंही तिरुअनंतपूरमचे रहिवासी आहेत. वडिलांचं निधन झाल्यानंतर रिक्त झालेल्या अरुविकरा मतदारसंघातून सबरीनाथन यांनी पोटनिवडणूक लढवली. त्यांनी निवडणुकीत विजय मिळवला. 2016 मधील विधानसभा निवडणुकीतही त्यांनी विजय मिळवत जागा कायम ठेवली. 32 वर्षीय दिव्या मेडिसिनमध्ये ग्रॅज्युएट आहे. 2013 मध्ये त्या आयएएस झाल्या.