रांची : परंपरा अनोखी आहे आणि मनाला भावणारीही. या परंपरेत संस्कार आहे आणि करारही. संस्कार निसर्गाप्रती आदराचा, तर करार पर्यावरणाच्या संरक्षणाचा. कधी ऐकलीय का तुम्ही... गोष्ट मुलींचा रोपट्याशी विवाह लावण्याची. ऐकली नसेल तर मग ऐका, येथे प्रत्येक घरातील मुलींचा रोपट्याशी विवाह होतो आणि तोही धूमधडाक्यात, गावातील पंचाच्या समक्ष. नववधू रोपट्याला तीन वेळा कुंकू लावून त्याला तीन प्रदक्षिणा घालतात. या विवाहाचे अख्खे गाव साक्षीदार बनते. ही मुलेही ज्या रोपट्याशी विवाह झाला आहे, त्याचे फळ आयुष्यात कधीही खात नाही, तसेच त्याची फांदीही तोडत नाही. एवढेच नाही तर वधू आणि तिच्या घरचे लोक या जावई रोपट्याची जीवनभर देखभाल करण्याची जबाबदारी घेतात. आहे ना अनोखी परंपरा. झारखंडचे संताल आदिवासी आजही या परंपरेचे तेवढ्याच आत्मीयतेने पालन करतात, जेवढे ते आधी करीत होते. संताली समुदायात या विवाहाला ‘मातकोम बापला’ म्हणतात. मातकोम म्हणजे मोहाचे झाड आणि बापला म्हणजे विवाह. मुलाशी विवाह होण्याच्या तीन तास आधी रोपट्याशी विवाहाची ही परंपरा पाळली जाते. हा विवाहही खऱ्या विवाहासारखाच असतो. मूळ विवाहाप्रमाणेच सर्व विधी केले जातात. या विवाहासाठी वधूला पिवळ्या रंगाची साडी नेसवली जाते. गावचे लोक पारंपरिक वाद्य वाजवीत घरातील महिलांसह तिची रोपट्यापर्यंत वरात काढतात. रोपट्याजवळ आल्यानंतर वधूची वहिनी प्रथेप्रमाणे रोपट्याला सुताचा दोरा बांधते. त्यानंतर नववधू रोपट्याला कुुंकू लावून त्याला तीन प्रदक्षिणा घालते. प्रदक्षिणेनंतर रोपट्याशी विवाहाचा विधी पूर्ण होतो. ग्रामीण भागात या परंपरेमुळे पर्यावरण संरक्षणास मोठी मदत होते. कारण प्रत्येक घर कोणत्या ना कोणत्या झाडाची काळजी घेत असते. रोपट्याशी विवाहामुळे त्याच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाते. रोपट्याला हिरवेगार ठेवण्यासह त्याचे नुकसान होऊ नये, यासाठी वधूचे कुटुंबीय दक्ष राहातात.
अनोखी परंपरा: येथे रोपट्याशी होतो प्रत्येक मुलीचा विवाह
By admin | Published: March 25, 2017 12:23 AM