तिरुवनंतपुरम : केरळमधील महापुराच्या आपत्ती निवारणासाठी सर्वच स्तरातून मदत करण्यात येत आहे. केरळच्या मदतीसाठी देशासह जगातील इतर देशांनी पुढाकार घेतला आहे. महापुराच्या संकटात अडकलेल्या केरळवासीयांना मदतीचा हात देण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीकडून (यूएई) मोठी आर्थिक मदत करण्यात आली आहे.
केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी संयुक्त अरब अमिरातीकडून (यूएई) तब्बल 700 कोटींची मदत करण्यात आल्याची माहिती केरळचे मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांनी दिली. तसेच, राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत केरळमधील महापूर, पुनर्वसन व पुनर्बांधणीसंबंधी चर्चा करण्यासाठी येत्या 30 ऑगस्टला विशेष अधिवेशन घेण्याची शिफारस राज्यपाल यांच्याकडे करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांनी सांगितले.
ऑगस्टच्या पावसाचा 87 वर्षांतील उच्चांकहवामान विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, केरळमध्ये गेल्या 87 वर्षांनंतर यंदा ऑगस्ट महिन्यात असा विक्रमी पाऊस पहिल्यांदाच पडला आहे. 1 ते 20 ऑगस्टदरम्यान यंदा केरळमध्ये 771 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 87 वर्षांनंतर पहिल्यांदाच इतका पाऊस पडला आहे. हवामान विभागाचे अधिकारी पुलक गुहाठाकुरता यांनी सांगितले की, 1931 साली राज्यात ऑगस्ट महिन्यात 1132 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. हा सर्वाधिक जास्त पावसाचा महिना होता.
केरळमधील जलप्रलय गंभीर आपत्ती घोषित केरळमधील जलप्रलयाला केंद्र सरकारने गंभीर आपत्ती म्हणून घोषित केले आहे. या महापुरामध्ये आजपर्यंत 400 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील पाच दिवसांत पावसाची तीव्रता कमी होणार आहे.
युएईच्या उद्योजकांकडून 12.5 कोटींची मदतकेरळच्या मदतीसाठी जगभरातून हात पुढे आले आहेत. संयुक्त अरब अमिरातीमध्ये असलेल्या तीन भारतीय उद्योजकांनी 12.5 कोटी रुपये देण्याचे जाहीर केले आहे. तर युएईने 34 कोटी रुपयांची मदत करण्याचे जाहीर केले आहे.