ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. ५ - दादरी येथे गोमांस खाल्ल्याच्या संशयावरुन झालेल्या हत्येमागे भाजपाचाच हात असल्या आरोप समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी केला आहे. या घटनेसंदर्भात आझम खान यांनी थेट संयुक्त राष्ट्रालाच पत्र लिहून या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
दादरीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी आझम खान यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आझम खान म्हणाले, दादरीतील घटनेप्रकरणी मी संयुक्त राष्ट्राचे महासचिव बान की मून यांना पत्र पाठवले आहे. भारतातील मुसलमानांच्या सद्यस्थितीची माहितीही मी त्यांना दिला असून या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंतीही मून यांना केली आहे. पंतप्रधान आंतरराष्ट्रीय पातळीवर स्थानिक प्रश्न मांडतात, देशातील जातीय दंगलींच्या वाढत्या प्रमाणाचा प्रश्न त्यांनी संयुक्त राष्ट्रात मांडावा असा टोलाही खान यांनी लगावला आहे. मोदींनी जातीय व्देषाचे विष पसरवणा-यांना नियंत्रणात आणले पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे. आता बिहार निवडणुकीचा अजेंडा बदलला आहे, विकासावर कोणीही बोलत नाही, गोहत्या केल्याबद्दल आता कोणीही उठून एखाद्याची हत्या करतो असे त्यांनी नमूद केले. गोमांस देणा-या पंचतारांकित हॉटेल्सना केंद्र सरकारने परवाने दिले, मग त्यांचे परवाने का रद्द करत नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला.