संयुक्त राष्ट्रे : भारत आणि पाकिस्तानने आपापसातील प्रश्न शांततामय मार्गांनी सोडवण्यासाठी चर्चा करावी, असे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले. भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेबद्दल भाष्य करण्यास संयुक्त राष्ट्रांचे (युनो) सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेझ यांनी नकार दिला. या एका विशिष्ट घटनेवर (कुलभूषण जाधव) भाष्य करण्याच्या अवस्थेला आम्ही नाहीत, असे गुटेरेझ यांचे प्रवक्ते स्टीफन दुतारीक यांनी बुधवारी येथे म्हटले. पाकिस्तानने जाधव प्रकरणात कायदा आणि न्यायाची योग्य प्रक्रिया वापरली नाही. या फाशीच्या शिक्षेला ठरवून केलेला खून असेच समजेल, असे भारताने म्हटले आहे. याबद्दल दुतारीक यांना प्रश्न विचारण्यात आला होता. जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेवरून भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला असून, दोन्ही देशांनी संवादाच्या माध्यमातून तो दूर करण्याची सूचना दुतारीक यांनी केली. (वृत्तसंस्था)जाधव प्रकरणी तडजोड नाही : पाकिस्तानी लष्करहेरगिरीच्या आरोपांवरून भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेवर कोणतीही तडजोड न करण्याचा निर्णय पाकिस्तानच्या वरिष्ठ लष्करी जनरल्सनी गुरुवारी घेतला. जाधव यांना फाशी दिले गेले तर त्याचे द्विपक्षीय संबंधांवर अत्यंत गंभीर परिणाम होतील, असा इशारा भारताने आधीच दिलेला आहे. लष्करप्रमुख जनरल कमर बाजवा यांच्या अध्यक्षतेखाली कोअर कमांडर्सची बैठक रावळपिंडीत झाली. त्यात कोणतीही तडजोड न करण्याचा निर्णय झाला. लष्कराच्या जनसंपर्क विभागाने निवेदनाद्वारे ही माहिती दिली.कुलभूषण जाधव प्रकरणाची थोडक्यात माहिती जनरल्सना देण्यात आली व अशा देशविरोधी कृत्यांबद्दल कोणतीही तडजोड न करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे त्यात म्हटले आहे.भारताला माहिती नाहीनवी दिल्ली : कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानात कोठे ठेवण्यात आले आहे आणि त्यांची प्रकृती कशी आहे, याबाबत भारत सरकारला कोणतीही माहिती नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने गुरुवारी सांगण्यात आले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाळ बागले म्हणाले की, कुलभूषण जाधव निर्दोष आहेत आणि त्यांची सुटका पाकिस्तान सरकारने करावी, अशी भारतातील प्रत्येक व्यक्तीची भावना आहे आणि परराष्ट्र मंत्रालयालाही तसेच वाटत आहे. त्यामुळे त्याच्या सुटकेसाठी भारत सरकार प्रयत्न करीत आहे. कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी कोणत्याही टोकाला जाऊ , असे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज पुन्हा एकवार स्पष्ट केले.
कुलभूषण जाधव यांच्या फाशीवर संयुक्त राष्ट्र गप्पच
By admin | Published: April 14, 2017 1:28 AM