नई दिल्ली : विविधतेतील एकता हीच आपली खरी ताकद आहे. भारतातील विविधता, लोकशाही आणि विकास जगासमोरील एक आदर्श आहे. तसेच, भौगोलिक विविधतेने संपन्न असलेल्या आपल्या देशात यशस्वीपणे निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान महत्वाचे ठरत आहे, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितले.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करत अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. प्रजासत्ताक दिन आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. 26 नोव्हेंबर रोजी आपण 70 वा 'संविधान दिन' साजरा करणार आहोत. शिक्षण, कला, संशोधन आणि खेळाबरोबरच लष्कराच्या तीनही दलात महिला आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितले.
याचबरोबर, देशातील सर्व व्यक्तिंना समान संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. देशवासीयांच्या आशा, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि विकसित भारत तयार करण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आपण आहोत. देशाला अद्याप मोठा पल्ला गाठायचा आहे. तसेच, रेल्वे सेवेतील सुधारणा, मेट्रो निर्माण, रस्ते बांधणी आणि देशांतर्गत विमान सेवेतील सुधारणांमुळे प्रवास सुखकर होत आहे. याशिवाय, मोबाइल तसेच इंटरनेटमुळे डिजिटल कनेक्टिव्हिटीमध्ये क्रांतिकारी बदल होत असल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ईव्हीएमवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. याविषयी बोलताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ईव्हीएमचे समर्थन केले. ते म्हणाले, निष्पक्ष निवडणुका पार पाडण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान अत्यंत गरजेचे आहे. मतदान करणे आपले कर्तव्य असून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहनही यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद केले.