- व्यंकटेश केसरी नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन पुढील आठवड्यात सुरू होत असून, सरकारला उघडे पाडण्यात विरोधी पक्षांचे एकमत असले तरी अधिवेशनात नेतृत्वाच्या मुद्यावर त्यांच्यात एकमत नाही. याशिवाय पाच राज्यात होणार असलेल्या विधानसभा निवडणुकीमुळेही भाजपविरोधकात अंतर वाढले आहे.
तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या अधिवेशनात मी दुय्यम भूमिकेत असणार नाही, असे संकेत देत संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रभावी समन्वयासाठी भाजपविरोधी पक्षांशी संपर्क वाढवला आहे. सोमवारी टीएमसीने आपल्या कार्यकारी समितीची बैठक कालिघाटमध्ये बोलावली आहे. याच दिवशी काँग्रेसचे राज्यसभेतील तसेच विरोधी पक्षांचे नेते मल्लिकार्जुन खरगे येथे सभागृहातील विरोधी नेत्यांची बैठक घेतील. तथापि, टीएमसीचे वरिष्ठ नेते अभिषेक बॅनर्जी, सुदीप बंदोपाध्याय, डेरेक ओब्रायन हे खरगे यांच्या बैठकीला हजर राहणार नाहीत, कारण ते कालिघाटमधील बैठकीला जाणार आहेत.
ममता बॅनर्जी यांचे राष्ट्रवादी काँग्रेस. शिवसेना, आम आदमी पक्ष, द्रमुक आणि इतर प्रादेशिक पक्षांशी चांगले संबंध आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला काँग्रेसपासून अंतर राखणे अवघड आहे, कारण महाराष्ट्रात हे दोन्ही पक्ष काँग्रेससह सत्तेत आहेत.
ॉसंसदेत अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्ष काँग्रेससोबत काम करणार की टीएमसीसोबत, हे अजून स्पष्ट झालेले नाही. बिजू जनता दल, वायएसआर काँग्रेस, टीआरएस आणि टीडीपी हे सरकारला अनुकूल दिसत असून, त्यांंनी विरोधकांसोबत जाण्यास नकार दिला आहे. या पक्षांसाठी त्यांच्या राज्यांचे (ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगण) हित विरोधी पक्षांच्या ऐक्यापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे.
काँग्रेस नेते संपर्कात - चौधरी चौधरी यांनी ममता बॅनर्जी या काँग्रेसला काँग्रेसमध्ये (एम) रूपांतरित करीत असल्याचा आणि त्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांची सत्ता कायम राखण्यासाठी साधन बनत असल्याची टीका केली होती. विरोधी पक्षांच्या आघाडीत त्या अंतर निर्माण करीत आहेत. बॅनर्जी यांच्यासाठी काँग्रेस हे सोपे लक्ष्य आहे. कारण अजूनही काही काँग्रेस नेते त्यांच्या संपर्कात आहेत, असा आरोपही त्यांनी केला.