लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : रशिया-युक्रेन, तसेच इस्रायल-पॅलेस्टिनी संघर्षाने जमिनीवरील युद्धाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. ही बाब भारतासोबत सीमावाद असलेल्या देशांसंदर्भात “अत्यंत महत्त्वाची” असेल, असे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी गुरुवारी सांगितले.
पहिल्या चाणक्य चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल राज शुक्ला (निवृत्त) यांच्या प्रश्नांना उत्तर देताना लष्करप्रमुख पांडे म्हणाले, चीनसोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवरील परिस्थिती सध्या स्थिर आहे आणि भविष्यातील कोणत्याही सुरक्षा आव्हानांना प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी आपले सैन्य लढाऊ क्षमता वाढवण्यावर भर देत आहे.
युक्रेन युद्धाचा धडा, आत्मनिर्भर व्हा...
जागतिक भू-राजकीय उलथापालथींवर लष्करप्रमुख पांडे म्हणाले की, रशिया-युक्रेन संघर्षातून लष्कराने जो महत्त्वाचा धडा शिकला तो म्हणजे लष्करी सामग्रीच्या आयातीवर अवलंबून राहू शकत नाही आणि संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता मिळविणे अत्यंत महत्त्वाचे आहे.