कोची (केरळ) : केरळच्या किनाऱ्याजवळ बेट आहे का? भारताच्या पश्चिम किनाऱ्याला केरळपासून दूर नव्या द्वीदल धान्याच्या आकारासारखी असलेली त्याची रचना गुगल मॅप्सने दाखवल्यावर अनेकांना आश्चर्य वाटले आहे. बेटासारखी असलेली रचना अरबी समुद्रात आढळलेली नाही, असे वृत्त न्यूज मिनिटने केरळ युनिव्हर्सिटी ऑफ फिशरीज अँड ओशन स्टडीजच्या (केयुएफओएस-कुफोस) अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिले. आतापर्यंत दृष्टीस न पडलेली पण पाण्याखाली काही नवी रचना आहे का? याची तपासणी तज्ज्ञ करतील.
गुगल मॅप्सने हे उघड केल्यावर चेल्लानाम कार्शिका टुरिझम डेव्हलपमेंट सोसायटीने कुफोसला पत्र लिहिल्यानंतर तज्ज्ञांसह अनेक जण गोंधळून गेले. गुगल मॅप्सने ज्या रचनेची प्रतिमा दाखविली ती केरळच्या किनाऱ्यापासून थोडीशीच दूर आहे. तिचा आकार हा कोचीच्या सुमारे निम्मा असून, किनाऱ्यापासून साधारण सात किलोमीटरवर ती आहे. कुफोसचे कुलगुरू के. राजी जॉन म्हणाले की, “आणखी तपासानंतरच ती रचना ही वाळू किंवा खूप मोठा सलग भूप्रदेश (लँडमास) किंवा पाण्याखालील बेट आहे का हे उघड होईल.” स्थानिक मच्छीमारांनी हा प्रकार कोचीन बंदरात चिखल, गाळ काढण्याचा परिणाम असून, शक्यतो अशी शंका उपस्थित केली आहे.