अज्ञात व्यक्तीचा संशयास्पदरीत्या जळून मृत्यू रेल येथील घटना, घातपाताचा संशय
By admin | Published: December 20, 2014 10:27 PM
रेल: दहीहांडा पोलीस स्टेशनांतर्गत येत असलेल्या रेल (धारेल) येथे गावाबाहेरच्या एका झोपडीत शनिवारी पहाटे एका अज्ञात व्यक्तीचा संशयास्पदरीत्या आगीत होरपळून मृत्यू झाला. मृतदेहाचा अक्षरश: कोळसा झाल्यामुळे मृतदेह ओळखणे शक्य झाले नाही. याबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.
रेल: दहीहांडा पोलीस स्टेशनांतर्गत येत असलेल्या रेल (धारेल) येथे गावाबाहेरच्या एका झोपडीत शनिवारी पहाटे एका अज्ञात व्यक्तीचा संशयास्पदरीत्या आगीत होरपळून मृत्यू झाला. मृतदेहाचा अक्षरश: कोळसा झाल्यामुळे मृतदेह ओळखणे शक्य झाले नाही. याबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.पोलीस सूत्रांनुसार, आकोट तालुक्यातील रेल येथील रामदास डोंबाजी पळसपगार यांची गावाबाहेर ई-क्लास जमिनीवर एक झोपडी आहे. या झोपडीत त्यांनी कुटार भरून ठेवलेले आहे. शनिवारी सकाळी ही झोपडी जळून खाक झाल्याचे गावातील काही लोकांना निदर्शनास आले. जवळ जाऊन पाहिले असता, झोपडीत एका इसमाचा जळून खाक झालेला मृतदेह आढळून आला. पोलीस पाटील रेखा चरणदास इंगळे यांनी याबाबत दहीहांडा पोलिसांना कळविले. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार ताराचंद किल्लेवाले, भास्कर तायडे, साखरकर, मेंढे, इंगळे, वानखडे, पाटील आदींनी रेल गावाला भेट दिली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पीएसआय भास्कर तायडे करीत आहेत. गावाबाहेरच्या झोपडीला आग कशी लागली, तसेच कुलूप लावलेले असताना झोपडीत अज्ञात व्यक्ती आत कशी शिरली, ही प्रश्ने अनुत्तरीत राहत असल्यामुळे घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. (वार्ताहर)