नवी दिल्लीः वर्षं 2017मध्ये उत्तर प्रदेशात झालेल्या उन्नाव तरुणी अपहरण आणि बलात्कार प्रकरणात तीस हजारी कोर्टानं भाजपाचे निलंबित आमदार कुलदीप सिंह सेंगरला दोषी ठरवलं आहे. तर महिला सहकारी असलेल्या शशी सिंह यांची न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे. तीस हजारी कोर्टाचे न्यायाधीश धर्मेश शर्मा यांनी हा निर्णय सुनावला असून, 19 डिसेंबरला सेंगरला कोणती शिक्षा ठोठावायची यावर निर्णय होणार आहे.न्यायालयानं 10 डिसेंबरला सर्वच पक्षकारांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निर्णय 16 डिसेंबरपर्यंत राखून ठेवला होता. आज सुनावणी करताना या निर्णयावर न्यायालयानं सेंगरला दोषी ठरवलं. सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर हे प्रकरण लखनऊहून दिल्लीतल्या तीस हजारी कोर्टाकडे वर्ग करण्यात आलं होतं. न्यायाधीश धर्मेश शर्मा यांनी 5 ऑगस्टपासून या प्रकरणावर प्रतिदिन सुनावणी सुरू केली होती. न्यायालयानं बाल लैंगिक अपराधांचे संरक्षण(पॉक्सो) कलम 3 व 4, (अल्पवयीनशी दुष्कर्म) आणि भादंवि कलम 120बी (गुन्हेगारी कट), 363 (अपहरण), 366 (अपहरण आणि महिलेवर विवाहासाठी दबाव टाकणं), 376 (दुष्कर्म) असे गुन्हे निश्चित केलेले आहेत. 4 जून 2017ला नोकरी देण्याच्या बहाण्यानं सेंगरनं सहकारी शशी सिंह हिच्यासोबत मिळून कट रचला आणि 16-17 वर्षांच्या तरुणीशी जबरदस्तीनं शारीरिक संबंध प्रस्थापित केले.असं घडलं उन्नाव प्रकरण?पीडिता आणि तिच्या आईनं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानी जाऊन आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानंतर हे प्रकरण उजेडात आलं. पीडितेच्या वडिलांविरोधात 3 एप्रिल 2018ला शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या मारहाणीत पीडितेच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. 28 जुलै रोजी काकांना भेटून परतताना रायबरेलीत पीडिता, तिची काकी, मावशी आणि वकिलांच्या कारला एका ट्रकनं धडक दिली. यात काकी आणि मावशीचा मृत्यू झाला होता. तर पीडितेचा वकीलही गंभीर जखमी झाले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर लखनऊहून दिल्लीला आणून जखमींना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जिथे बरेच दिवस त्यांच्यावर उपचार झाले. सध्या पीडिता कुटुंबीयासोबत दिल्ली राहत असून, उन्नावमध्ये परतण्यास तिनं नकार दिला आहे.