लखनऊ : उन्नावमधील सामूहिक बलात्कार प्रकरणावरून सध्या उत्तरप्रदेशात तनावाचे वातावरण परसले आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी सरकारला याप्रकरणामुळे प्रचंड टीकेला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी भाजपा आमदार कुलदीपसिंग सेनगर यांच्याविरोधात पोलिसांनी 260 दिवसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याविरोधात भादंवि कलम 363, 366, 376 आणि 506 तसेच पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता कुलदीपसिंग सेनगर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
कुलदीपसिंग सेनगर यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आता योगी सरकारने याप्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी काल एसआयटी चौकशी करण्यात आली, यावेळी पोलीस, प्रशासन आणि रुग्णालयाकडून निष्काळजी करण्यात आल्याचे उघडकीस आले. दरम्यान, याप्रकरणी उत्तरप्रदेशचे पोलीस आयुक्त ओपी सिंह यांनी सांगितले की, कुलदीपसिंग सेनगर सध्या आरोपी आहेत. त्यांना अटक करण्यासंदर्भात निर्णय सीबीआय घेईल.
आयोगाची सरकारला नोटीसराष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने यूपी सरकार आणि राज्याच्या पोलीसप्रमुखांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणाचा चोवीस तासांत अहवाल देण्याचे त्यांना सांगण्यात आले असून, पीडित कुटुंबाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देशही दिले आहेत.
भाजपा आमदाराच्या भावाला अटकयुवतीवर बलात्कार केल्याप्रकरणी भाजपाचे आमदार कुलदीपसिंग सेनगर यांचा भाऊ अतुलसिंग सेनगर याला उनाव येथून लखनऊ क्राइम ब्रँचने अटक केली आहे. कुलदीपसिंग व अतुलसिंग या दोघांनी युवतीच्या वडिलांना आठवडाभरापूर्वी मारहाण केल्याचीही तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती. यासंदर्भात युवतीने पत्रकारांना सांगितले की, दोन्ही भावांनी माझ्या आयुष्याचे मातेरे केले आहे. दोन्ही भावांना अटक झाली पाहिजे.