लखनौ - उत्तर प्रदेशातील उनाव जिल्ह्यातल्या सामूहिक बलात्कार प्रकरण व तिच्या वडिलांचा पोलीस कोठडीत असताना झालेला मृत्यू या दोन्ही प्रकरणांच्या चौकशीसाठी पोलिसांचे विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. तपास पथकाचा अहवाल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज संध्याकाळपर्यंत मागवला आहे. दरम्यान, याप्रकरणातील आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगरची पत्नी संगीता सेनगरनं डीजीपी ओ.पी.सिंह यांची भेट घेणार आहे. आपल्या पतीला सामूहिक बलात्कार प्रकरणात अडकवलं जात आहे, असे त्यांनी म्हटले असून याप्रकरणी न्याय मिळवून देण्याची मागणी त्या करणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे, पीडित मुलीनं पुन्हा एकदा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
भाजपा आमदार कुलदीपसिंग सेनगर व त्यांच्या साथीदारांनी बलात्कार केल्याचा आरोप युवतीने केला आहे. युवती व तिच्या कुटुंबीयांनी रविवारी (8 एप्रिल) मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर केलेला आत्मदहनाचा प्रयत्न सुरक्षारक्षकांनी हाणून पाडला होता. या वेळी युवतीच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र त्यांना पोलीस कोठडीत रविवारी रात्री अत्यवस्थ वाटू लागले. परंतु उनाव जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी ते मरण पावले.
आयोगाची सरकारला नोटीसराष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने यूपी सरकार आणि राज्याच्या पोलीसप्रमुखांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणाचा चोवीस तासांत अहवाल देण्याचे त्यांना सांगण्यात आले असून, पीडित कुटुंबाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देशही दिले आहेत.
भाजपा आमदाराच्या भावाला अटकयुवतीवर बलात्कार केल्याप्रकरणी भाजपाचे आमदार कुलदीपसिंग सेनगर यांचा भाऊ अतुलसिंग सेनगर याला उनाव येथून लखनऊ क्राइम ब्रँचने अटक केली आहे. कुलदीपसिंग व अतुलसिंग या दोघांनी युवतीच्या वडिलांना आठवडाभरापूर्वी मारहाण केल्याचीही तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती. यासंदर्भात युवतीने पत्रकारांना सांगितले की, दोन्ही भावांनी माझ्या आयुष्याचे मातेरे केले आहे. दोन्ही भावांना अटक झाली पाहिजे.