नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील सामूहिक बलात्कार प्रकरण आणि पीडित मुलीच्या वडिलांचा संशयास्पद झालेल्या मृत्यूबाबत काँग्रेस पार्टीनं सोशल मीडियावर योगी सरकारविरोधात #BhajpaSeBetiBachao या हॅश टॅग अंतर्गत अभियान छेडलं आहे. पीडित मुलीनं भाजपा आमदारावर बलात्काराचा आरोप केला आहे. या घटनेवरुन काँग्रेसनं भाजपावर हल्लाबोल चढवला आहे.
ज्या भाजपा आमदारावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे, योगी सरकार त्याला संरक्षण देत असल्याचा आरोप करत काँग्रेस पार्टीचे नेते व कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर #BhajpaSeBetiBachao या अभियानांतर्गत भाजपाविरोधात मोहीम सुरू केली आहे. ''भाजपाचे आमदार, कार्यकर्ते आणि मंत्री स्वतःला कायद्यापेक्षा मोठे का मानतात ? हा एक मोठा प्रश्न असून भाजपाने त्याचे उत्तर द्यायला हवं'', हा मुद्दा काँग्रेस पार्टीनं आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर उपस्थित केला आहे.
नेमके काय आहे प्रकरण?एका 18 वर्षीय तरुणीनं भाजपा आमदार कुलदीपसिंग सेनगर व त्यांच्या साथीदारांनी बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. न्याय मिळावा यासाठी तरुणी व तिच्या कुटुंबीयांनी रविवारी (8 एप्रिल) मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर केलेला आत्मदहनाचा प्रयत्न सुरक्षारक्षकांनी हाणून पाडला होता. या वेळी युवतीच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र त्यांना पोलीस कोठडीत रविवारी रात्री अत्यवस्थ वाटू लागले. परंतु उनाव जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी ते मरण पावले.
आयोगाची सरकारला नोटीसराष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने उत्तर प्रदेश सरकार आणि राज्याच्या पोलीसप्रमुखांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणाचा चोवीस तासांत अहवाल देण्याचे त्यांना सांगण्यात आले असून, पीडित कुटुंबाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देशही दिले आहेत.
भाजपा आमदाराच्या भावाला अटकयुवतीवर बलात्कार केल्याप्रकरणी भाजपाचे आमदार कुलदीपसिंग सेनगर यांचा भाऊ अतुलसिंग सेनगर याला उनाव येथून लखनऊ क्राइम ब्रँचने अटक केली आहे. कुलदीपसिंग व अतुलसिंग या दोघांनी युवतीच्या वडिलांना आठवडाभरापूर्वी मारहाण केल्याचीही तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती. यासंदर्भात युवतीने पत्रकारांना सांगितले की, दोन्ही भावांनी माझ्या आयुष्याचे मातेरे केले आहे. दोन्ही भावांना अटक झाली पाहिजे.