उन्नाव (उत्तर प्रदेश) - बऱ्याच वादविवादानंतर उन्वाव येथे जिवंत जाळण्यात आलेल्या बलात्कार पीडितेच्या मृतदेहावर अखेर अंत्यसंस्कार करण्यात आले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत पीडितेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतल्याने उन्नावमधील बलात्कार पीडितेवरील अंत्यसंस्कारांबाबत तिढा निर्माण झाला होता. अखेरीस पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर पीडितेचे कुटुंबीय अंत्यसंस्कारासाठी तयार झाले.
पीडितेच्या कुटुंबाचे म्हणणे आहे की आरोपी जेलमधून सुटून आल्यानंतर त्यांना सतत धमकी देत होता आणि याआधीही त्याने अनेकदा पीडितेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. या पीडितेवर मागील वर्षी बलात्कार झाला होता. दोन आरोपींपैकी एका आरोपीला दहा दिवसांपूर्वीच जामीन मिळाला होता. दरम्यान, पीडितेच्या खटल्याची तारीख रायबरेली कोर्टात गुरुवारी होती. त्यासाठी उन्नावमधून रायबरेलीला जात असताना आरोपींनी पीडितेच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शिवम, त्याचे वडील रामकिशोर, शुभम, हरिशंकर आणि उमेश बाजपेयी यांना अटक केली आहे.