नवी दिल्ली - रायबरेली येथे झालेल्या अपघातात उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणी आणि तिचे वकील गंभीर जखमी झाले होते. तर पीडित तरुणीची काकी आणि मावशी यांचा मृत्यू झाला होता. दिल्लीतील एम्स रुग्णालयात पीडित तरुणीवर सध्या उपचार सुरू आहेत. त्यामुळे उन्नाव बलात्कार प्रकरणाची आजपासून एम्स रुग्णालयातच सुनावणी घेण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने पीडितेची साक्ष नोंदवण्यासाठी रुग्णालयात सुनावणी घेण्यास सांगितले होते. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने ट्रॉमा सेंटरमध्ये तात्पुरते न्यायालय सुरू करण्यास परवानगी दिली.
पीडित तरुणीचा जबाब नोंदवण्यासाठी बुधवारी (11 सप्टेंबर) जिल्हा न्यायाधीश धर्मेश शर्मा यांच्यासमोर सुनावणी घेण्यात येणार आहे. नोकरी मागण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर कुलदीप सिंह सेंगर याने 2017 रोजी बलात्कार केल्याचा आरोप आहे. यानंतर सेंगर याची भाजपाकडून पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर काही दिवसांनी पीडितेच्या कारला अपघात झाला होता. हा अपघात नसून हल्ला असल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबियांनी केला होता. अपघातात गंभीर जखमी झालेल्या पीडितेची प्रकृती खालावल्याने तिला तातडीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात हलवण्यात आले होते.
सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयात उन्नाव बलात्कार प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. तरुणीवर पीडित तरुणीवर सध्या उपचार सुरू आहेत. त्यामुळे तिची साक्ष झालेली नाही. न्यायालयाने एम्स रुग्णालयातील ट्रॉमा सेंटरमध्ये न्यायालय उभारण्यास परवानगी देऊन तसे निर्देश दिले होते. तसेच 'पीडित तरुणीला स्ट्रेचरवरून न्यायालयात आणणे धोकादायक ठरू शकते असे मतही नोंदवले होते. त्यानंतर आजपासून उन्नाव बलात्कार प्रकरणाची एम्स रुग्णालयातच सुनावणी घेण्यात येणार आहे.
पीडित तरुणीवर याआधी लखनऊ येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यानंतर तरुणीला रुग्णवाहिकेने पुढील उपचारासाठी लखनऊ येथून नवी दिल्लीतील ‘एम्स’मध्ये हलवण्यात आले आहे. विमानतळावरून रुग्णालयात नेण्यासाठी दिल्ली पोलिसांनी ग्रीन कॉरिडोर तयार केला होता. त्यामुळे 14 किमी अंतर 18 मिनिटांत पार करण्यात आले. वरिष्ठ डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. तसेच ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी औषधोपचाराची गरज होती. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.