नवी दिल्ली : ज्या प्रवाशांनी १९९ किलोमीटर वा त्याहून कमी अंतरासाठी अनारक्षित तिकीट काढले असेल, ते यापुढे तीन तासांनंतर आपोआप रद्द ठरेल, असा नियम रेल्वेने केला आहे. हा नियम १ मार्चपासून अमलात येणार आहे. रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी बुधवारी लोकसभेत प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.प्रवाशांनी अनारक्षित तिकीट काढल्यापासून तीन तासांच्या आत प्रवास सुरू करणे या नियमानुसार बंधनकारक करण्यात येणार आहे. तिकीट काढल्यानंतर लगेच जी गाडी निघणार असेल, त्या गाडीने वा तीन तासांच्या आत संबंधित ठिकाणी पोहोचणाऱ्या गाडीने प्रवाशांनी प्रवास करावा असा त्याचा अर्थ आहे. मात्र १९९ किलोमीटरहून अधिक अंतरासाठी हा नियम लागू नसेल, असेही रेल्वे राज्यमंत्र्यांनी उत्तरात स्पष्ट केले आहे. १००० रेल्वे स्थानके आदर्शदेशभरात १००० रेल्वेस्थानकांचा शौचालये, पिण्याचे पाणी, भोजन व्यवस्था व प्रतीक्षालये यांसारख्या सुविधा असलेले ‘आदर्श रेल्वेस्थानक’ म्हणून विकास करण्यात आला आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी बुधवारी लोकसभेत दिली.‘आदर्श’ स्थानक योजनेला २००९-१० मध्ये सुरुवात करण्यात आली होती. या योजनेत १०५२ रेल्वेस्थानकांची निवड करण्यात आली आणि त्यांपैकी ९४६ स्थानकांचा २०१४-१५ पर्यंत विकास करण्यात आला, असे प्रभू यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
रेल्वेचे अनारक्षित तिकीट आता तीन तासांसाठीच
By admin | Published: February 25, 2016 3:24 AM