S Jaishankar on United Nations Security Council : भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. प्रत्येक मुद्द्यावर ते अतिशय खुलेपणाने आणि रोखठोकपणे आपले मत मांडतात. त्यांनी नुकतेच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) काही उणीवांवर बोट ठेवले आहे. जयशंकर यांनी सुरक्षा परिषदेची तुलना एखाद्या जुन्या क्लबशी केली आहे. या परिषदेतील काही सदस्यांना आपली पकड सैल पडू द्यायची नाही असा प्रकार दिसत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जयशंकर यांच्या मते, यामुळे जगाचे नुकसान होत आहे. यामुळे संयुक्त राष्ट्रांचा प्रभाव कमी होत आहे. परराष्ट्रमंत्र्यांचे हे विधान अनेक अर्थाने महत्त्वाचे आहे. भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणांसाठी प्रयत्न करत आहे. त्यात स्थायी सदस्यत्वासाठी ते प्रबळ दावेदार आहेत. सध्या सुरक्षा परिषदेवर अमेरिका आणि पाश्चात्य देशांचे वर्चस्व आहे. बदलत्या जगासोबत हे वर्चस्व मोडीत काढावे, अशी भारताची इच्छा आहे.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर रविवारी म्हणाले की, सुरक्षा परिषद जुन्या क्लबसारखी आहे. त्यात काही असे सेट सदस्य आहेत जे त्यावरील पकड सैल पडू देण्यास इच्छित नाहीत. त्यांना क्लबचा ताबा घ्यायचा आहे. अधिक सदस्य स्वीकारण्यास ते फारसे उत्सुक नाहीत किंवा त्यांच्या कार्यपद्धतींवर प्रश्नचिन्ह निर्माण व्हावे असे त्यांना वाटत नाही. एक प्रकारे हे मानवी अपयशच आहे.
परराष्ट्र मंत्री म्हणाले की आज ते जगाचे नुकसान करत आहे असे कळणे गरजेचे आहे. जगासमोरील प्रमुख समस्यांवर संयुक्त राष्ट्र संघ कमी प्रभावी दिसू लागला आहे. ते म्हणाले की, मी तुम्हाला जागतिक भावनाही सांगू शकतो. म्हणजेच, आज तुम्ही जगातील २०० देशांना विचाराल की त्यांना सुधारणा हव्या आहेत की नाही तर खूप मोठ्या संख्येने देश म्हणतील की होय, आम्हाला सुधारणा हव्या आहेत. असे असताना बदल करणे अपेक्षितच आहे.
दरम्यान, जयशंकर यांच्या स्पष्टवक्तेपणामुळेच भारताचे परराष्ट्र धोरण अधिक आक्रमक झाले आहे. युक्रेनसोबतच्या युद्धात रशियाकडून पेट्रोल खरेदीवर प्रश्न उपस्थित झाले असतानाही जयशंकर यांनी युरोपला आरसा दाखवला होता.