नवी दिल्ली – देशात कोरोना महामारीचा प्रकोप वाढला असून दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत आहे. फायझर आणि मॉडर्ना चांगल्या लसी आहेत. डिसेंबर २०२० पासून त्या उपलब्ध झाल्या मग भारतात आतापर्यंत आणल्या नाहीत. आपण चांगल्या लसीच्या लायक नाही का? आपण सुरक्षा उपकरणं परदेशातून खरेदी करत नाही का? कोरोना स्थिती युद्धजन्य नाही का? लस फक्त आणि फक्त भारतातच बनायला हव्यात का? अवैज्ञानिक लोक कोणत्याही देशाला बर्बाद करू शकतात भलेही ते देशाबाबत कितीही गर्व करत असतील अशा शब्दात प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी केंद्र सरकारला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना फटकारलं आहे.
चेतन भगत म्हणाले की, हवं तेवढं पैसे भरून आपल्याकडे पर्यायी लस उपलब्ध व्हायला हवी होती. मग ती लस इथं बनलेली असेल किंवा परदेशातून आयात केलेली असेल. आपल्या देशात गल्लोगल्ली कोरोना लसीकरणाचे कॅम्प लावण्याची आवश्यकता आहे तेव्हाच आपण या महामारीतून सुटका करू असं त्यांनी सांगितले आहे.
तसेच फायझर जगातील सर्वात प्रभावी लसीपैकी एक आहे. अनेक विकसित देश फायझर लसीचा वापर करत आहेत. या फायझर लशीने भारतात डिसेंबर २०२० मध्ये परवानगी मागितली होती. परंतु इथं त्यांना स्टडी करण्यास सांगितले. फायझरने फेब्रुवारी २०२१ ला त्यांनी दिलेला अर्ज परत मागे घेतला. जर डिसेंबरमध्ये आपण फायझरला परवानगी दिली असती तर अनेक जीव वाचले असते असा दावाही चेतन भगत यांनी ट्विटमध्ये केला आहे.
दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये आता परदेशात वापरण्यात येणाऱ्या कोणत्याही कोरोना लसीला भारतात आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. रशियाची स्पूतनिक V ची पहिली खेप १ मे पर्यंत भारतात येणार आहे. १ मे पासून देशभरात १८ वर्षावरील सर्वांना कोरोना लस देण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशनही सुरू झालं आहे. चेतन भगत यांच्या ट्विटवरून सोशल मीडियात चर्चेला उधाण आलं आहे. काही जण चेतन भगत यांचे समर्थन करत आहे तर काही केंद्र सरकारच्या भूमिकेचं समर्थन करत आहेत.
कंगना राणौतनंही चेतन भगतला दिलं उत्तर
चेतन भगत यांच्या दाव्यावर कंगना म्हणाली की, फायझर, मॉडर्ना बेस्ट वॅक्सिन आहेत हे कोणी सांगितलं? माझ्या काही मित्रांनी फायझर लस घेतली आहे. त्यांना खूप ताप आणि अंग दुखीचा त्रास झाला. तुम्ही भारत आणि भारतीयांचा राग करणं कधी सोडाल? भारतातील लसीची जगभरात मागणी आहे आणि सध्या आत्मनिर्भर भारत म्हणजे स्वत:च्या आर्थिक व्यवस्थेला चालना देणे असं कंगना म्हणाली आहे.