नवी दिल्लीदिल्लीत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी मोठी घोषणा केलीय. कोरोनावर लस येत नाही, तोपर्यंत दिल्लीतील शाळा सुरू होणार नाहीत, असं सिसोदिया यांनी जाहीर केलंय.
कोरोनाच्या उद्रेकामुळे संपूर्ण देशभरात मार्च महिन्यापासून शाळा बंद आहेत. तर काही ठिकाणी शाळा पुन्हा सुरू करण्यासाठीचे प्रयत्न देखील केले गेले. मात्र कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढत असल्याची परिस्थितीपाहून शाळा सुरू करण्याचा निर्णय मागे देखील घेण्यात आला आहे.
दिल्लीतील बहुतेक पालक शाळा सुरू करण्याच्या विरोधात असल्याचं सिसोदिया यांनी ३० ऑक्टोबर रोजी म्हटलं होतं. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत दिल्लीतील शाळा बंदच राहतील अशी घोषणा सिसोदिया यांनी केली होती. आता सिसोदिया यांनी थेट जोवर लस येत नाही तोपर्यंत शाळा सुरू होणार नाहीत अशी भूमिका घेतली आहे.
''आम्ही सतत पालकांच्या संपर्कात आहोत आणि त्यांचं मत जाणून घेत आहोत. शाळा सुरू करण्यासाठी सध्याचं वातावरण योग नसल्यानं सर्वजण साशंक आहेत. ज्या ठिकाणी शाळा सुरू करण्यात आल्या तिथं विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे दिल्लीतील शाळा पुढील आदेशापर्यंत बंदच राहतील'', असं सिसोदिया यांनी स्पष्ट केलं आहे.
इतर राज्यात शाळा पुन्हा सुरू करण्याचा विचारराज्यात अनलॉकची टप्प्याला सुरुवात झाल्यानंतर अनेक निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली. पण शाळा आणि महाविद्यालयं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं बंदच ठेवण्यात आली होती. शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय आता संबंधित राज्य सरकारवर सोपविण्यात आला आहे. काही राज्यांनी अनलॉक-५ च्या नियमांनुसार शाळा पुन्हा सुरू करण्याची तयारी देखील सुरू केली आहे. तर काही राज्यांनी कोरोनाचा पुन्हा उद्रेक होत असल्याचं लक्षात घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय मागे घेतला आहे.