नवी दिल्ली - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीर मुद्द्यावरुन भारतासोबतच्या लढाईत एकप्रकारे शरणागतीच पत्करली आहे. भारतात मोदी सरकार असेपर्यंत काश्मीरच्या मुद्द्यावर काहीच आशा नसल्याचं खान यांनी एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीदरम्यान म्हटले आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळात काश्मीर मुद्द्याबाबत समाधान होऊच शकत नाही, असेही खान यांनी म्हटले.
मोदी सरकारच्या काळात भारताने काश्मीरच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानला जसाश तसे उत्तर दिलंय. विशेष म्हणजे, भारताने सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक करुन पाकिस्तानला धडा शिकवला. तर, जम्मू आणि काश्मीरमधील कलम 370 हटवून काश्मीरमधील विशेष कायदाही रद्द केला आहे. त्यामुळे, काश्मीर प्रश्नावरुन मोदी सरकार पाकिस्तानशी कुठलिही तडजोड करायला तयार नसल्याचं भारताने दाखवून दिलंय. त्यामुळे, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही काश्मीर मुद्दा मोदी सरकार असेपर्यंत सोडूनच दिलाय, असेच दिसून येते.
मोदी सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे नाजी आणि हटलर यांच्या विचारधारेचं अनुकरण करतात. त्यामुळे, भारतात मोदींचे सरकार असेपर्यंत काश्मीर मुद्द्यावर तोडगा निघणार नसल्याचं खान यांनी म्हटलंय. बेल्जियमच्या टीव्ही नेटवर्क व्हीआरटीला दिलेल्या मुलाखतीमध्ये काश्मीर मुद्दयावरुन भारतासमोर पाकिस्तानने शरणागती पत्करल्याचेचं खान यांनी सूचवलंय. भारतात मजबूत आणि स्पष्ट विचारधारेचा माणूस देशाच्या नेतृत्वात आला, तरच काश्मीर प्रश्नावर समाधान निघेल, असेही इम्रान यांनी म्हटले आहे.