नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती घेईपर्यंत राष्ट्रपती भवनाचे कामकाज कसे चालते, याची मला यत्किंचितही कल्पना नव्हती. त्यामुळे तेथील कामकाजाची थोडी कल्पना यावी म्हणून शपथविधीच्या दोन दिवस आधी मी मुलीला तेथे पाठविले होते, असा किस्सा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी बुधवारी येथे सांगितला. राष्ट्रपती भवनाचे वस्तुसंग्रहालय दोन आॅक्टोबर रोजी खुले होणार असून, या ब्रिटिशकालीन भव्य वास्तूतील विशेष भेटवस्तू व खजिना लोकांना पाहता येणार आहे, असे ते म्हणाले. मुखर्जींनी दरबार हॉल, अशोका हॉल, बँक्वेट हॉल व त्यांचा विविध सरकारी सोहळ्यांसाठी होणारा उपयोग, तसेच ग्रंथालय, ब्रिटिश व्हॉईसरॉय जेथे थांबत तो भाग यासह राष्ट्रपती भवनाच्या मांडणीची माहिती दिली. राष्ट्रपतींनी सुरू केलेल्या ‘इन रेसिडेन्स’ या उपक्रमांत प्रसिद्ध बंगाली लेखक प्रो. रंजन बॅनर्जी यांनी सात दिवस इथे वास्तव्य केले. त्याबद्दल मुखर्जी यांनी त्यांचे आभार मानले. आयआयटी, एनआयआयटीतील बुद्धिमान विद्यार्थ्यांसह १४० लोकांनी राष्ट्रपती भवनात वास्तव्य करून तेथील पुस्तकांचे वाचन केले. राष्ट्रपती भवनाच्या ग्रंथालयातील पुस्तके वाचण्यासाठी पाचच काय १५ वर्षही पुरेसे नाहीत, असे मुखर्जी म्हणाले. ते स्वत: साक्षेपी वाचक आहेत. मुखर्जी म्हणाले की, राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेण्यासाठी जुलै १९७९ मध्ये पहिल्यांदा दिल्लीला आलो होतो, तेव्हापासून सलग ४३ वर्षे राष्ट्रपती भवनापासून हाकेच्या अंतरावर राहत असूनही राष्ट्रपती भवनचे कामकाज कसे चालते हे मला ठाऊक नव्हते. कामकाजाची कल्पना यावी म्हणून शपथविधीच्या दोन दिवस आधी मी मुलीला तेथे पाठविले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
शपथ घेईपर्यंत राष्ट्रपती भवनाच्या कामाची कल्पना नव्हती
By admin | Published: September 08, 2016 5:08 AM