ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 8 - जयललिता यांच्या पश्चात सुरू झालेल्या नेतृत्वाच्या लढाईमुळे अण्णा द्रमुक पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडल्यानंतर तीव्र नाराजी व्यक्त करत वेगळी चूल मांडण्याचे संकेत देणाऱ्या ओ. पनीरसेल्वम यांनी दिल्यानंतर पक्षाच्या महासचिव शशिकला यांनी आपल्या गटातील 130 आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले आहे. या आमदारांपैकी कुणी बंडखोरी करून पनिरसेल्वम यांच्या गटात सामील होऊ नये, तसेच राज्यपाल तामिळनाडूत परत येईपर्यंत त्यांचे समर्थन आपल्यासोबत राहावे, यासाठी शशिकला यांनी ही खबरदारी घेतली आहे.
आता हे आमदार राज्यपालांकडून शशिकला यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रण येण्याची वाट पाहत आहेत. राज्यपालांकडून सत्तास्थापनेसाठी निमंत्रण न आल्यास राष्ट्रपतींची भेट घेण्याचा प्रस्ताव त्यांच्याकडे असेल. दरम्यान आज सकाळी चेन्नईतील पक्षाच्या मुख्यालयात 130 समर्थक आमदारांना संबोधित करताना शशिकला यांनी पनीरसेल्वम यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्या म्हणाल्या,"राजीनाम्यासंदर्भात पनिरसेल्वम यांनी केलेले आरोप खोटे आहेत. आमदारांच्या रविवारी झालेल्या बैठकीतील निर्णय गुप्त नव्हते. प्रसारमाध्यमांमध्येही त्याचे वृत्त आले होते. तसेच विधिमंडळाच्या नेतेपदी त्यांनीच माझे नाव सुचवले होते." त्याबरोबरच पक्षाची महासचिव या नात्याने मुख्यमंत्र्यांनी केलेल्या चुकांची त्यांना शिक्षा देणे माझे काम होते, असेही त्यांनी सांगितले.
जयललिता यांनी ज्या पक्षाविरोधात नेहमी लढा दिला त्या पक्षासोबत पनिरसेल्वम यांनी जवळीक साधल्याचा आरोपही त्यांनी केला. "जयललितांच्या मृत्यूनंतर समर्थकांनी मला मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यास सांगितले होते. पण त्यावेळी मी दु:खात असल्याने असे केले नाही," असेही त्या म्हणाल्या.
130 #AIADMK MLAs(Sasikala supporters) being taken in a bus to a Hotel: Sources— ANI (@ANI_news) February 8, 2017