अलीगढ: उत्तर प्रदेशातील अलीगढमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घराबाहेर आजोबासोबत फिरायला गेलेल्या चार वर्षांच्या चिमुरड्यावर एका आवारा बैलाने हल्ला केला. या हल्ल्यात तो चिमुकला गंभीर जखमी झाला. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. यामध्ये बैल एका त्या चिमुकल्याला तुडवताना दिसतोय.
संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैदगुरुवारी सकाळी 7.40 वाजता अलीगढच्या धानीपूर मंडी परिसरात ही घटना घडली. चिमुकला आजोबांसोबत रस्त्यावर फिरत होता, यावेळी आजोबा मुलाला रस्त्यावर सोडून काही सेकंदांसाठी दुसरीकडे जातात, तेवढ्यात एक बैल धावत येऊन मुलावर हल्ला करतो. तो आधी चिमुकल्याला शिंगाने मारतो, नंतर त्याला तुडवून खेचतो आणि मुलावर बसतो. आरडाओरडा ऐकून आजोबा धावत येतात आणि मुलाला बाहेर काढतात.
घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर बैलाला पकडण्यासाठी पालिकेचे पथक धानीपूर भागात रवाना करण्यात आले आहे. यासह परिसरात फिरणाऱ्या इतर बैलांना पकडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बैलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या प्रतीकचे बाबा महिपाल सिंग यांनी सांगितले की, त्यांनी मुलाला जवळच्या रुग्णालयात नेले, तिथे डॉक्टरांनी मुलावर उपचार केले. मुलाच्या तोंडावर जखमा झाल्या आहेत पण तो धोक्याबाहेर आहे.