नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रविवारी तिसऱ्या टप्प्यातील मतदान झालं आहे. राज्यातील 16 जिल्ह्यांतील 59 जागांसाठी मतदान झालं. मतदान प्रक्रियेदरम्यान समाजवादी पक्षाने ट्विट करून निवडणूक आयोगाकडे तक्रार करत अनेक जागांवर गडबड झाल्याचा आरोप केला आहे. मतदान सुरू झाल्यापासून पाच तासांत समाजवादी पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक-दोन नव्हे तर सुमारे 150 तक्रारी ट्विट करण्यात आल्या. हा आकडा दर तासाला वाढत होता. समाजवादी पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून आरोप करणारे पहिले ट्विट सकाळी 8.03 वाजता करण्यात आले होते.
पक्षाच्या ट्विटर हँडलवरून काही वेळातच 120 हून अधिक ट्विट करण्यात आले. या ट्विटमध्ये राज्यातील 59 जागांवरील मतदानादरम्यान मतदान केंद्रांवर गडबड झाल्याचा आरोप करण्यात आला. 'कानपूर ग्रामीण भागातील भोगनीपूर मतदारसंघातील मतदान क्रमांक 121 वर सायकलच्या चिन्हाचे बटण दाबल्यावर भाजपाची पावती बाहेर येत आहे. निवडणूक आयोगाने दखल घेऊन सुरळीत आणि निष्पक्ष मतदानाची खात्री करावी, असा आरोप समाजवादी पक्षाने एका ट्विटमध्ये केला होता. भोगनीपूर उपजिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेतली. ट्विटरच्या माध्यमातून आरोपाचं खंडन केलं आहे.
विधानसभा मतदारसंघ 208 मधील मतदान क्रमांक 121 मध्ये कोणत्याही प्रकारची अडचण नाही. मतदान केंद्रावरील मतदान सुरळीत आणि निष्पक्ष सुरू आहे. मशिन्समध्ये कोणतीही अडचण नाही, असे त्यांनी सांगितले. त्याचवेळी कानपूरच्या जिल्हाधिकारी नेहा शर्मा यांनीही माहिती दिली. आतापर्यंत अशी तीन प्रकरणे समोर आली आहेत ज्यात मतदानाची गोपनीयता भंग झाली आहे. आम्ही तिन्ही प्रकरणांमध्ये कारवाई केली आहे, असे त्यांनी सांगितले होते. मैनपुरी जिल्ह्यातील करहल मतदारसंघातल्या मतदान क्रमांक 319, 320 वर भाजपा उमेदवार एसपी सिंह बघेल हे पोलिंग पार्टीला धमकावत आहेत. ही अत्यंत गंभीर बाब आहे, निवडणूक आयोग व जिल्हा प्रशासनाने कृपया याची दखल घेऊन निष्पक्ष व भयमुक्त निवडणुका घ्याव्यात, असा दावा आणखी एका आणखी एका ट्विटमध्ये करण्यात आला होता.
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव स्वतः करहल मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांना कडवी टक्कर देण्यासाठी भाजपाने केंद्रीय मंत्री आणि आग्राचे खासदार एसपी सिंह बघेल यांना येथून उमेदवारी दिली आहे. तिसऱ्या टप्प्यात हाथरस, फिरोजाबाद, एटा, कासगंज, मैनपुरी, फारुखाबाद, कन्नौज, इटावा, औरैया, कानपूर देहत, कानपूर नगर, जालौन, झांसी, ललितपूर, हमीरपूर आणि महोबा जिल्ह्यात मतदान झालं आहे. या जिल्ह्यांतील निवडणुकीसाठी 15 हजार 557 मतदान केंद्रांवर 25 हजार 794 बूथ उभारण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक आणि मतदान कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.