लखनौ - उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार सध्या ऐन भारात आहे. आरोप प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान, भारतीय कुस्ती संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि कैसरगंजमधील भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचा उल्लेख आपला जुना मित्र असा केला आहे. तसेच ते क्षत्रिय असल्याचा दावा केला आहे. ओवेसी हे इराणवाले नसून भारतीय श्रीरामाचे वंशज असल्याचा दावा केला आहे.
भाजपा खासदार बृजभूषण यांनी त्यांचा मुलगा आणि भाजपाचे उमेदवार प्रतीक भूषण सिंह यांच्या समर्थनार्थ आयोजित सभेला संबोधित करताना सांगितले की, असदुद्दीन ओवेसींची लढाई ही अखिलेश यादव यांच्याशी आहे. कारण अखिलेश यादव यांना मुस्लिमांची मते हवी आहेत. मात्र ते मुस्लिमांना उघडपणे त्याचे श्रेय देऊ इच्छित नाही. मुस्लिम नेत्यांना सोबत घेऊ इच्छित नाहीत. ते म्हणाले की, ओवेसी आणि अखिलेश यादव यांची लढाई मुस्लिमांचे नेतृत्व कुणाच्या हातात असावे यावरून आहे.
बृजभूषण सिंह यांनी आरोप केला की, अखिलेश यादव हे एक नंबरचे धोकेबाज आहेत. त्यांनी त्यांच्या वडिलांना फसवले, काकांना फसवले. फसवणूक करणे हे त्यांचं काम आहे. त्यांनी आता स्वामी प्रसाद मौर्य यांनाही फसवले. स्वामी प्रसाद मौर्य समाजवादी पक्षात जाऊन फसले. २०-३० जागांचे आश्वासन देऊन त्यांना पक्षात नेले होते. मात्र प्रत्यक्षात काहीच मिळालं नाही.