लखनऊ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने (EC) लादलेल्या निर्बंधांदरम्यान भारतीय जनता पार्टीने (BJP) जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक मेगा प्लॅन तयार केला आहे. व्हर्च्युअल रॅलीसाठी (Virtual Rally) भाजपाने जोरदार तयारी केली आहे. व्हर्च्युअल रॅलीसाठी अनेक ठिकाणी मोठे स्क्रीन लावण्यात येणार आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पहिल्या व्हर्च्युअल रॅलीला संबोधित करतील. या व्हर्च्युअल रॅलीमध्ये पंतप्रधान मोदी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी विधानसभेच्या 100 मतदारसंघातील लोकांना संबोधित करणार आहेत.
दरम्यान, देशातील सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे निवडणूक आयोगाने फिजिकल रॅलींवर बंदी घातली आहे. त्यामुळे राजकीय पक्ष व्हर्च्युअल रॅली काढत आहेत. तसेच, निवडणूक आयोग आता या रॅलींवर खर्च होणाऱ्या पैशांवर बारीक लक्ष ठेवून आहे.
प्रचारादरम्यान निवडणूक आयोगाचे लक्ष निवडणूक आयोगाने या वर्षी 31 जानेवारीपर्यंत फिजिकल रॅलींवर बंदी घातली आहे आणि त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाचे निरीक्षक प्रचार साहित्यावर लक्ष ठेवून आहेत. निवडणूक आयोगाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कंपन्यांना रॅलींवरील बंदीमुळे मोठ्या ऑनलाइन प्रचारादरम्यान ऐच्छिक आचारसंहितेचे पालन सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.
निवडणुकीसाठी खर्च मर्यादेत वाढ विशेष म्हणजे, निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी खर्च मर्यादा वाढवली आहे आणि 6 जानेवारी 2022 रोजी जारी केलेल्या नवीन आदेशानुसार, मणिपूर आणि गोव्यात उमेदवाराच्या खर्चाची कमाल मर्यादा 28 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. इतर तीन राज्यांसाठी पंजाब, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडसाठी 40 लाख रुपये निश्चित करण्यात आले आहेत.