नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेची निवडणूक अटीतटीची होत असून, अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष भाजपाला जोरदार टक्कर देत आहे. त्यामुळे यावेळी उत्तर प्रदेशची सत्ता राखणे भाजपाला जड जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये काय निकाल लागणार आणि भाजपा किती जागा जिंकणार, अशी विचारणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्याकडे केली असता अमित शाहा यांनी उत्तर प्रदेशात भाजपाचेच सरकार बनणार असून, भाजपाला या निवडणुकीत ३०० हून अधिक जागा मिळतील असा दावा केला आहे.
नेटवर्क १८ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमित शाहा म्हणाले की, यावेळी उत्तर प्रदेशामध्ये कायदा आणि सुव्यवस्था हा मोठा मुद्दा आहे. भाजपाने राज्यातील प्रशासनामध्ये व्यापक बदल केला आहे. आधीची सरकारं जातीयवादावर चालत असत, मात्र आता तसे नाही आहे, असे अमित शाहांनी सांगितले.
उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा जिंकेल असे विचारले असता अमित शाहा म्हणाले की, मी संपूर्ण उत्तर प्रदेशचा दौरा करून तुमच्यासमोर बसलो आहे. उत्तर प्रदेशमध्ये बहुमतासह भाजपाचे सरकार सत्तेवर येईल. योगींच्या नेतृत्वाखाली जनतेचं मन जिंकण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. आता भाजपासाठी विजयी चौकार भाजपा मारणार आहे. ओपिनियन पोलमधून जो अंदाज मांडला जातो, तो अनेकदा महत्त्वपूर्ण ठरतो. मात्र सर्वेमध्ये जे सांगितले जाते, ते खरं होईल, असं म्हणणं आवश्यक नाही आहे. आम्ही उत्तर प्रदेशात ३०० हून अधिक जागा जिंकणार आहोत, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला.
विधानसभेच्या ४०३ जागा असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपा आणि सपामध्ये अटीतटीची लढाई सुरू आहे. एकूण सात टप्प्यान निवडणूक होत असून, त्यातील तीन टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. ७ मार्च रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार असून, १० मार्च रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे.