नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी 6 मिनिटांचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला. "आता मोठा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. भाजपाच्या डबल इंजिन सरकारने गेल्या पाच वर्षात जे काही केले आहे ते मोठ्या बांधिलकीने केले आहे आणि जे काही सांगितले आहे, ते तुमच्यावर विश्वास ठेऊन केले आहे" असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. "या निवडणुका येईपर्यंत तुम्ही सर्व काही पाहिले आणि लक्षपूर्वक ऐकले. मला मनापासून एक गोष्ट सांगायची आहे. या पाच वर्षांत खूप काही घडले. "
उत्तर प्रदेशातील एक लाख गावांमध्ये सर्व घरांमध्ये 24 तास वीज पोहोचवण्यात आली आहे, असे पहिल्यांदाच घडले आहे. यामुळे कोट्यवधी नागरिकांचे जीवन कसे बदलले आहे याची काहींना कल्पनाही नसेल, असे ते पुढे म्हणाले. या 5 वर्षांत खूप काही अभूतपूर्व घडले आहे. जनतेने सावध राहा. तुम्ही चुकलात तर सर्व मेहनतीवर पाणी फिरेल आणि यावेळी यूपीचे काश्मीर, बंगाल आणि केरळ व्हायला वेळ लागणार नाही. मी इथे मत मागायला आलो नाही. पण 70 वर्षात हे काम पूर्वीच्या सरकारांना करता आले नाही, याबद्दल मी त्यांची माफी मागतो. आम्ही घरोघरी कोट्यवधी घरांमध्ये शौचालये बांधली, तुमची मते मिळवण्यासाठी हा माझा जुगाडही नव्हता."
"स्वच्छतेपेक्षाही माझ्यासाठी माता-भगिनींच्या सन्मानाचा आणि प्रतिष्ठेचा प्रश्न होता. प्रथमच लाखो घरे व कुटुंबांना पक्की घरे मिळाली आहेत. त्यांच्या डोळ्यातील चमक अतिशय बोलकी आहे. यापुढे शेकडो निवडणुकांतील विजयाही फिका आहे, असे ते बोलले. निवडणुका येतील, निवडणुका जातील, पण आजपर्यंत चुलीवर काम करणाऱ्या आमच्या माता-भगिनी आता आजारी पडणार नाहीत, निरोगी असतील. आयुष्मान योजना आज उत्तर प्रदेशातील कोट्यवधी कुटुंबांसाठी आजारांना तोंड देण्यासाठी आधार बनली आहे. 'हर घर नल' योजनेच्या माध्यमातून आम्ही घराघरात पाणी पुरवठा करत आहोत."
"उत्तर प्रदेशात कोणीही उपाशी झोपणार नाही"
"एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यात द्रुतगती मार्ग टाकत आहोत, राज्यभर औद्योगिक कॉरिडॉर उभारण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत हे तुम्ही पाहिले आहे. याच दरम्यान, 2 वर्षांपूर्वी कोरोना व्हायरसच्या भयंकर महामारीने थैमान घातले आहे. सर्वात मोठे श्रीमंत आणि प्रगत देश देखील हतबल दिसले. जगभर हाहाकार माजला. लोकं रोगाने नाही पण उपासमारीने नक्कीच मरतील, असे वाटत होते. पण उत्तर प्रदेशात कोणीही उपाशी झोपणार नाही, असे आम्ही ठरवले. आम्ही कोट्यवधी कुटुंबांना रेशन द्यायला सुरुवात केली" असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.