नवी दिल्ली - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार करणाऱ्या केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी मोठं आश्वासन दिलं आहे. भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास होळी आणि दिवाळीला मोफत गॅस सिलिंडर देण्याची घोषणा केली आहे. याशिवाय विद्यार्थिनींना स्कुटी देणार असल्याचीही घोषणा राजनाथ सिंह यांनी केली. उत्तर प्रदेशमधील मनकापूरमध्ये एका सभेत ते बोलत होते. मनकापूर गोंडा जिल्ह्यात येतं. या ठिकाणी पाचव्या टप्प्यात 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे.
मनकापूरमधून भाजपाने आपल्या विद्यमान आमदार रमापती शास्त्री यांच्यावरच विश्वास टाकत तिकिट दिलं आहे. शास्त्री सध्याच्या योगी सरकारमध्ये मंत्री देखील आहेत. राजनाथ सिंह यांनी जनसभेला संबोधित करताना "दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला केला तेव्हा सर्जिकल स्ट्राईकचा निर्णय घेण्यात आला. भाजपा देशाला निराश करणार नाही. भाजपा देशाच्या सन्मानासोबत कोणतीही तडजोड करत नाही. ब्रह्मोसची निर्मिती उत्तर प्रदेशमध्ये होईल. हे एक असं क्षेपणास्त्र आहे ज्याला शत्रू घाबरतो" असं म्हटलं आहे.
"आम्हीच खरे समाजवादी आहोत, कारण आम्ही प्रत्येक व्यक्तीला रेशन आणि पेन्शन देत आहोत"
"सीएए इतर ठिकाणी त्रास देण्यात येणाऱ्या नागरिकांना नागरिकत्व देण्यासाठी आणला आहे. भाजपाने आपलं आश्वासन पूर्ण केलं आहे. अयोध्यात राम मंदीर निर्माण केलं जात आहे. राज्य आणि केंद्र सरकारविरोधात कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. याचा अर्थ सरकार लोकांच्या कल्याणासाठी काम करत आहे. आम्हीच खरे समाजवादी आहोत, कारण आम्ही प्रत्येक व्यक्तीला रेशन आणि पेन्शन देत आहोत" असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. तसेच मोदी सरकार शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान निधी देतं. हा निधी वाढवून पुढे वर्षाला 12 हजार इतका केला जाणार आहे. योगी सरकार सत्तेत आल्यावर विद्यार्थिनींना स्कुटी दिली जाईल असंही म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिलं आहे.
"...तर यूपीचे काश्मीर, बंगाल आणि केरळ व्हायला वेळ लागणार नाही"
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी काही दिवसांपूर्वी 6 मिनिटांचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला होता. "आता मोठा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. भाजपाच्या डबल इंजिन सरकारने गेल्या पाच वर्षात जे काही केले आहे ते मोठ्या बांधिलकीने केले आहे आणि जे काही सांगितले आहे, ते तुमच्यावर विश्वास ठेऊन केले आहे" असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं होतं. "या निवडणुका येईपर्यंत तुम्ही सर्व काही पाहिले आणि लक्षपूर्वक ऐकले. मला मनापासून एक गोष्ट सांगायची आहे. या पाच वर्षांत खूप काही घडले."
उत्तर प्रदेशातील एक लाख गावांमध्ये सर्व घरांमध्ये 24 तास वीज पोहोचवण्यात आली आहे, असे पहिल्यांदाच घडले आहे. यामुळे कोट्यवधी नागरिकांचे जीवन कसे बदलले आहे याची काहींना कल्पनाही नसेल, असे ते पुढे म्हणाले. या 5 वर्षांत खूप काही अभूतपूर्व घडले आहे. जनतेने सावध राहा. तुम्ही चुकलात तर सर्व मेहनतीवर पाणी फिरेल आणि यावेळी यूपीचे काश्मीर, बंगाल आणि केरळ व्हायला वेळ लागणार नाही. मी इथे मत मागायला आलो नाही. पण 70 वर्षात हे काम पूर्वीच्या सरकारांना करता आले नाही, याबद्दल मी त्यांची माफी मागतो. आम्ही घरोघरी कोट्यवधी घरांमध्ये शौचालये बांधली, तुमची मते मिळवण्यासाठी हा माझा जुगाडही नव्हता" असं म्हटलं होतं.