UP Assembly Election 2022: उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी सध्या निवडणुकीच्या रिंगणात प्रचाराचा धुरळा उडवून दिला आहे. भाजपाचा आज पश्चिम यूपीमध्ये महाकॅम्पेन दिवस आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज वृंदावन येथील बिहारी मंदिराला भेट दिली आणि पूजाअर्चा केली.
अमित शाह यांनी यावेळी मथुरेत भाजपाच्या 'डोअर टू डोअर' कॅम्पेनला देखील सुरुवात केली. यावेळी अमित शाह यांनी उपस्थितांना संबोधित करताना योगी सरकारच्या कार्यकाळात झालेल्या विकास कामांची माहिती दिली.
"अखिलेश बाबूंच्या कार्यकाळाच्या तुलनेत योगी सरकारच्या काळात राज्यातील दरोडेखोरी ७० टक्क्यांनी कमी झाली आणि लूटमारीची प्रकरणं ७२ टक्क्यांनी घटली. हत्येच्या प्रकरणांमध्ये २९ टक्क्यांनी घट नोंदविण्यात आली आहे. तसंच अपहरणाच्या घटना ३५ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत", असं अमित शाह म्हणाले.
उत्तर प्रदेशातील विकासाचं श्रेय जनतेचं"ब्रज क्षेत्रातील समस्त जनतेला मी हात जोडून धन्यवाद देण्यासाठी इथे आलो आहे. कारण २०१४ साल असो किंवा २०१७ असो नाहीतर आताचं २०२२ चं वर्ष असो. येथील जनतेनं भाजपाला मोठा पाठिंबा दिला आहे. मतमोजणीवेळी या मतदार संघांमधून केवळ कमळ चिन्हाचाच बोलबाला राहिला आहे. त्यामुळे येथील विकासाचं खरं श्रेय येथील जनतेला जातं. याआधी केवळ जातीयवाद, घराणेशाही आणि भ्रष्टाचारासाठी येथे सपा, बसपाची सरकारं काम करत होती", असं अमित शाह म्हणाले.