नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून, २०१ जागांसाठी कल हाती आले आहेत. यामध्ये भाजप १२८ जागांसह आघाडीवर आहे. तर सपा ६९ जागा, बसप, ०२, अन्य ०२ वर आहेत. काँग्रेस पक्षाला अजूनही खाते उघडता आले नाही. उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा भाजपाची सत्ता येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच दरम्यान समाजवादी पार्टीच्या नेत्याने भाजपावर काही गंभीर आरोप केले आहेत. "ईव्हीएममध्ये गैरव्यवहार झाला असून, भाजपा लोकशाहीचा नाश करत आहे" असं म्हणत जोरदार हल्लाबोल केला आहे.
लखनऊचे सपा नेते नरेश उत्तम पटेल (Naresh Uttam Patel) यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. "भाजपा लोकशाहीचा नाश करत आहे. काही ठिकाणी बॅलेट पेपर पकडण्यात येत आहे. तर काही ठिकाणी ईव्हीएममध्ये छेडछाड करण्यात आली आहे. जनतेने यावेळी भाजपाचं खोटं संपवण्याचा निर्णय घेतला आहे" असं पटेल यांनी म्हटलं आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी मतमोजणी सुरू झाल्यावर एक ट्विट केले असून, मतमोजणी केंद्रांवर सपाचे कार्यकर्ते सतर्क राहतील. मतमोजणी केंद्रांवरील अधिकारी वर्गाला आणि पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा, असे म्हणत इम्तिहान बाकी है अभी हौसलों का, वक़्त आ गया है अब ‘फ़ैसलों’ का, असं ट्विट केलं आहे.
ईव्हीएम आणि बॅलेट पेपरवरून समाजवादी पार्टीच्या नेत्यांचा हल्लाबोल
भाजपा नेते ब्रिजेश पाठक यांनी भाजपाच बहुमताचे सरकार स्थापन करेल असं म्हटलं आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये ईव्हीएम आणि बॅलेट पेपरवरून समाजवादी पार्टीच्या नेत्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. निवडणुकीच्या निकालांकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं असताना आझमगडमध्ये मतमोजणी केंद्राकडे जात असलेल्या एका गाडीत हजारो बॅलेट पेपर सापडले आहेत. हे सापडल्यानंतर आता समाजवादी पार्टीने मोठा गोंधळ घातला आहे. मिळालेल्य़ा माहितीनुसार, आझमगडच्या पाच विधानसभा क्षेत्रातून आलेले ईव्हीएम मशीन बेलईसामधील स्ट्राँग रुममध्ये ठेवली आहे.
मतमोजणी केंद्राकडे जाणाऱ्या गाडीत सापडले हजारो बॅलेट पेपर; सपाने घातला गोंधळ
बुधवारी रात्री जवळपास दहा वाजता एका पोस्टल बॅलेटच्या एआरओच्या सरकारी वाहनामध्ये काहीही उपयोग नसताना आणले गेलेले बॅलेट पेपर सापडले आहेत. बॅलेट पेपरचा बंडल सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. बॅलेट पेपर पाहताच समाजवादी पार्टी प्रचंड संतापली आणि त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. गाडीला घेरलं आणि शिवीगाळ सुरू केली. या गोंधळाची महिती मिळताच डीएम अमृत त्रिपाठी व एसपी अनुराग आर्य हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी याचा तपास केला असता हा एआरओचा निष्काळजीपणा असल्याचं समोर आलं आहे.