लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचे दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. यामध्ये काल झालेल्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानावेळी रामपूरमध्ये बोगस मतदान करताना दोन महिलांना पकडण्यात आले. हा प्रकार रामपूरमधील रजा डिग्री कॉलेजमधील पोलिंग सेंटर येथे घडला. इथे बुरखा घालून मतदान करण्यासाठी दोन महिला आल्या होत्या. यामधील एकीने बोगस मतदान केले होते. मात्र दुसरीला मतदान करताना पकडले गेले. पोलिसांनी या दोन्ही महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र कुमार मांदर यांनी याबाबत सांगितले की, रजा डिग्री कॉलेज येथील पोलिंग सेंटरवर दोन महिलांना बोगस मतदान करताना पकडण्यात आले. तपासामध्ये त्यांचा पत्ता योग्य नसल्याचे दिसून आले आहे. त्यांनी सांगितले की, पकडण्यात आलेल्या दोन्ही महिला ह्या नात्याने आई आणि मुलगी आहेत. यातील आईने तिचं मत दुसऱ्या मतदान केंद्रात घातलं होतं. त्यानंतर स्वत:चं मतदान कार्ड देऊन मुलीच्या माध्यमातून मतदान करण्याचा प्रयत्न करत होती. मात्र हा प्रकास समोर आल्यावर सदर महिलेने एक बोगस मत घातल्याचे उघड झाले. त्यानंतर या दोघींवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू झाली आहे.
दरम्यान, हा प्रकार समोर आल्यावर केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या एका शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, महिलांनी बुरखा घालून कुठलीही ओळख न दाखवता पोलिंग बूथवर जाण्यास सांगण्यात येत आहे. तसेच मुस्लीम महिलांना त्यांची ओळख न सांगण्याच्या सूचनाही विरोधी पक्षांना दिल्या आहेत.