लखनऊ : भारतीय जनता पार्टीने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत (UP Assembly Election 2022) गोरखपूर मतदारसंघातून रिंगणात उतरवल्यानंतर आता समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav will contest in UP Assembly Elections) यांनीही विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अखिलेश यादव पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत.
अखिलेश यादव सध्या आझमगड लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. 2000 मध्ये पहिल्यांदा कन्नौज लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकून अखिलेश संसदेच्या कनिष्ठ सभागृहात म्हणजेच लोकसभेत पोहोचले होते. 2004 आणि 2009 च्या सार्वजनिक निवडणुकीतही ते कन्नौजमधून विजयी झाले आणि लोकसभेत पोहोचले होते. 2012 मध्ये अखिलेश यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना कन्नौज लोकसभा मतदारसंघातून राजीनामा द्यावा लागला होता. मुख्यमंत्री झाल्यानंतर अखिलेश यादव विधान परिषदेचे सदस्य झाले होते.
अखिलेश यादव कोणत्या जागेवरून निवडणूक लढवणार?अखिलेश यादव पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत, मात्र समाजवादी पार्टीकडून अद्याप जागा जाहीर करण्यात आलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील निवडणुकीमध्ये अखिलेश यादव पूर्वांचल किंवा मध्य उत्तर प्रदेशमधील कोणत्याही जागेवरून निवडणूक लढवू शकतात. तसेच, अखिलेश यादव आझमगड किंवा गाझीपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरू शकतात, असे सांगण्यात येत आहे.
सात टप्प्यात विधानसभा निवडणूकदरम्यान, यावेळी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या 403 जागांसाठी सात टप्प्यांत निवडणुका होणार असून 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. उत्तर प्रदेशामध्ये 10 फेब्रुवारी रोजी राज्याच्या पश्चिम भागातील 11 जिल्ह्यांतील 58 जागांवर मतदान होऊन विधानसभा निवडणुकीची सुरुवात होणार आहे. त्यानंतर 14 फेब्रुवारीला दुसऱ्या टप्प्यात 55 जागांसाठी, 20 फेब्रुवारीला तिसऱ्या टप्प्यात 59 जागांसाठी, 23 फेब्रुवारीला चौथ्या टप्प्यात 60 जागांसाठी, 27 फेब्रुवारीला पाचव्या टप्प्यात 60 जागांसाठी, 3 मार्चला सहाव्या टप्प्यात 57 जागांसाठी आणि 7 मार्चला सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात 54 जागांसाठी मतदान होणार आहे.